माण तालुक्यात कुकुडवाड परिसरात प्रथमच नेपाळी गरुडाचे दर्शन; युरोपियन नीलपंख पक्षी निरीक्षणात

by Team Satara Today | published on : 28 October 2026


सातारा : माणदेशातील जैवविविधतेचा अभ्यास, वन्यजीव निरीक्षण आणि नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनाच्या उद्देशाने माणदेश कन्झर्व्हेशन प्रोजेक्टच्या पथकाने कुकुडवाड परिसरात तीन दिवसीय वन्यजीव निरीक्षण मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान युरोपियन नीलपंख या स्थलांतरित पक्ष्यांचे सुमारे ८ ते १० पक्षी निरीक्षणात आले.
यासोबतच, जागतिक स्तरावर अर्थात संकटग्रस्त म्हणून वर्गीकृत असलेल्या स्टेप ईगल नेपाळी गरुड या शिकारी पक्ष्याचेही रंजक दर्शन घडले. त्याचे फोटो अर्णव गंधे यांनी टिपले. या नोंदींमुळे कुकुडवाड परिसराचे वन्यजीव आणि पक्ष्यांच्या अधिवासाच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित झाले आहे. वनस्पतीमध्ये कंदिलपुष्पाचे निरीक्षण करण्यात आहे.
या तीन दिवसीय मोहिमेचे नेतृत्व माणदेश कन्झर्व्हेशन प्रोजेक्टचे प्रमुख चिन्मय सावंत यांच्या मार्गदर्शाखाली पथकातील वन्यजीव अभ्यासक अर्णव गंधे आणि वनस्पती अभ्यासक अजित काटकर यांनी केले. क्षेत्रीय निरीक्षण, पक्ष्यांच्या, वनस्पती नोंदी आणि अधिवासाचा अभ्यास यांच्या माध्यमातून परिसरातील जैवविविधतेविषयी अधिक माहिती संकलित करण्याचा प्रयत्न या मोहिमेत करण्यात आला. सध्या माणदेशात कमी पर्जन्यमान, पाण्याची टंचाई आणि आव्हानात्मक पर्यावरणीय परिस्थिती आहे.
येथील गवताळ प्रदेश आणि काटेरी झुडपी अधिवास अनेक प्रकारच्या वन्यजीवांना आश्रय देतात. मात्र, अधिवासाचे नुकसान आणि पाण्याची कमतरता यांसारख्या समस्यांमुळे या परिसंस्थांचे संरक्षण करणे अधिक महत्त्वाचे ठरते. कुकुडवाड परिसरातील प्राथमिक वन्यजीव निरीक्षणातून या भागात जैवविविधता अभ्यास संवर्धनासाठी मोठी क्षमता असल्याचे दिसून येते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडणीची मागणी करून सोन्याची चेन हिसकावून नेल्या प्रकरणी मल्हारपेठेतील एकावर गुन्हा
पुढील बातमी
कर्जमाफी योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची पाचवी यादी प्रसिद्ध; जिल्‍हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांची माहिती, जिल्ह्यातील ४१ हजार ५२६ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र

संबंधित बातम्या