पुरवठा निरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात; दहिवडी तहसील कार्यालयातील कारवाई; धान्य कोट्यासाठी घेतली ३,५०० रुपयांची लाच

by Team Satara Today | published on : 27 October 2026


दहिवडी  : स्वस्त धान्य दुकानाचा मासिक धान्य कोटा मंजूर करून दिल्याच्या मोबदल्यात ३ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना माण (दहिवडी) तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक मेघराज जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदाराचे स्वस्त धान्य दुकान आहे. दुकानाचा नोव्हेंबर २०२६ चा मासिक धान्य कोटा मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात पुरवठा निरीक्षक मेघराज जाधव यांनी ३ हजार ७०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार २७ ऑक्टोबर रोजी करण्यात आली होती. या तक्रारीची त्याच दिवशी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी जाधव यांनी तडजोडीनंतर ३ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दहिवडी तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून ३ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, दहिवडी पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पोलिस उपअधीक्षक शैला कोरडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नितीन गोगावले, निलेश राजपूरे, गणेश ताटे आणि चालक अजित कर्णे यांनी सापळा कारवाईत सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मांढरगडावर रुग्णवाहिका न मिळल्याने अस्वस्थ झालेल्या भाविक महिलेचा दुर्देवी मृत्यू; ट्रस्टकडून मदतीस टाळाटाळ केल्याचा नातेवाईकांचा आरोप
पुढील बातमी
सातारा शहर वाहतूक शाखेचा कारवायांचा धडाका सुरुच; नियमभंग करणार्‍या मॉडिफाय बुलेटवर धडक कारवाई

संबंधित बातम्या