ऊस वाहतुकीच्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई - उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते

by Team Satara Today | published on : 26 October 2026


सातारा :  गळीत हंगाम सुरू झाल्याने रस्त्यांवर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. ऊस वाहतुकीच्या सुरक्षा नियमांचे उल्लंघन होऊन या वाहनांमुळे रात्रीच्या वेळी होणारे भीषण अपघात रोखण्यासाठी फलटण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.
रस्ता सुरक्षा व अपघात रोखण्यासाठी ऊस वाहतूकदारांनी एका ट्रॅक्टरला एकापेक्षा जास्त ट्रॉल्या (मल्टीपल ट्रेलर) जोडणे आणि ट्रॅक्टरवर मोठ्या आवाजातील म्युझिक सिस्टिम लावण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.  विना-नोंदणीकृत जुगाड गाड्यांमधून ऊस वाहतूक करणे पूर्णपणे बेकायदेशीर असून, त्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. ट्रॅक्टर, ट्रॉली, ट्रक व बैलगाड्यांच्या पुढील व मागील बाजूस रिफ्लेक्टर बोर्ड आणि रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे अनिवार्य आहे. तसेच पाठीमागील वाहने दिसण्यासाठी दोन्ही बाजूंना रिअर-व्हयू आरसे असणे आवश्यक आहे. लक्ष विचलित होऊन अपघात होऊ नयेत म्हणून ऊस वाहतूक करताना ट्रॅक्टरवर लाऊड स्पीकर, टेप रेकॉर्डर किंवा कोणत्याही प्रकारची म्युझिक सिस्टम वाजवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.  अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या सर्व नियमांचा थेट 'ऊस वाहतूक कंत्राटामध्येचा समावेश करण्याचे आणि नियम मोडल्यास कंत्राट रद्द करण्याचे निर्देश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विधाते यांनी सर्व साखर कारखान्यांना दिले आहेत.  वाहन चालकाकडे वाहनाचे नोंदणी पुस्तक, वैध विमा आणि वाहन चालवण्याचा परवाना असणे बंधनकारक आहे.
रस्ता सुरक्षेच्या या सर्व नियमांचे पालन करण्याबाबतच्या स्पष्ट 'अटी व शर्ती' कारखान्यांनी ट्रॅक्टर मालकांसोबतच्या 'ऊस वाहतूक कंत्राटामध्ये' समाविष्ट कराव्यात. जे वाहनचालक किंवा कंत्राटदार या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांचे कंत्राट तात्काळ रद्द करण्यात येईल, अशी अट कंत्राटात असणे आता कारखान्यांसाठी सक्तीचे करण्यात आले आहे.  नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना वजन काट्यावर प्रवेश देऊ नये.  सुरक्षित वाहतुकीसाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री विधाते, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, फलटण यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुणे विभाग पदवीधर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघांच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज - विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
पुढील बातमी
लोकसहभागातून सावली येथे वनराई बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास; भूजल संवर्धनासाठी शासनासोबत ग्रामस्थांचा पुढाकार

संबंधित बातम्या