सातारा : सातारा रेल्वे स्थानकातील विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी आलेले पुणे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी कामांच्या संथ गतीवरून अधिकारी आणि ठेकेदारांची चांगलीच झाडाझडती घेतली. अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेंतर्गत कोट्यवधींचा निधी उपलब्ध होऊनही अनेक कामे अपूर्ण का आहेत, प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील शेडसह अन्य सुविधा अद्याप का उभारण्यात आल्या नाहीत, असा सवाल करत त्यांनी संबंधितांना धारेवर धरले. यावेळी अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये 'तू तू, मैं मैं' झाल्याने पाहणी दौऱ्यात चांगलाच तणाव निर्माण झाला.
विभागीय व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी सातारा रेल्वे स्थानकातील मुख्य प्रवेशद्वार, परिसर, प्रवासी प्रतीक्षालय, शौचालये, स्वच्छतागृह, सिग्नल यंत्रणा तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि अन्य भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. सुरू असलेल्या विकासकामांची सद्यस्थिती, कामांचा दर्जा आणि प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी अनेक कामे बंद अथवा अपूर्ण असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना जाब विचारला.
रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेंतर्गत सातारा रेल्वे स्थानकातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील सोयीसुविधांसाठीही लाखो रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या प्लॅटफॉर्मवर अद्याप शेडसह अन्य आवश्यक कामे पूर्ण झालेली नसल्याने विभागीय व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 'कामे अद्याप पूर्ण का झाली नाहीत? आतापर्यंत दिलेला निधी गेला कुठे?' असा थेट सवाल करत त्यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना जाब विचारला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने पाहणी दौऱ्यातील वातावरण चांगलेच तापले.
प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि सोयीस्कर वातावरण उपलब्ध करून देणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे विकासकामांमुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
दरम्यान, सातारा रेल्वे स्थानकाच्या पाहणीनंतर विभागीय व्यवस्थापक वर्मा यांनी जिल्ह्यातील वाठार रेल्वे स्थानकासह अन्य स्थानकांनाही भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. या दौऱ्यामुळे रेल्वेच्या संबंधित विभागांच्या कामकाजावर लक्ष केंद्रित झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी कशी होते, याकडे आता लक्ष लागले आहे.
कामांचा दर्जा आणि वेळापत्रकावरून कानउघाडणी
रेल्वे स्थानकातील विकासकामे करताना योग्य नियोजन, गुणवत्तेचे निकष आणि निर्धारित वेळेचे पालन करणे आवश्यक असल्याचे वर्मा यांनी स्पष्ट केले. कामांच्या प्रगतीबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याने त्यांनी संबंधित यंत्रणेला जबाबदारीची जाणीव करून दिली. कामांमध्ये दिरंगाई किंवा निष्काळजीपणा आढळल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही विभागीय व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी दिला.
सातारा रेल्वे स्थानकातील कामांवरून अधिकारी-ठेकेदारांत खडाजंगी; विभागीय व्यवस्थापकांनी अधिकारी-ठेकेदारांची घेतली चांगलीच झाडाझडती
by Team Satara Today | published on : 25 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा