चार दिवसांत नदी प्रवाही न झाल्यास कोयना धरणाचे उघडू; राजू शेट्टी यांचा इशारा;भिलवडी येथे कृष्णा नदीपात्रात सर्वपक्षीय आंदोलन

by Team Satara Today | published on : 25 October 2026


भिलवडी : ‘‘दिल्लीश्वरांच्या आदेशावरून कृष्णा नदी कोरडी ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे कटकारस्थान आहे. चार दिवसांत कृष्णा नदी प्रवाही झाली नाही, तर शेतकऱ्यांसह कोयना धरणाचे दरवाजे उघडू, असा खणखणीत इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.आज येथे कोरड्या कृष्णा नदीपात्रात त्यांनी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन केले.
श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘यंदा कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असताना ऑक्टोबरमध्येच ‘कृष्णे’चे पात्र कोरडे ठणठणीत पडले आहे. यामागे, जलसंपदा मंत्री व मुख्यमंत्र्यांचा कावा आहे. दिवाळाच्या तोंडावर साखरेची टंचाई होईल, भाव वाढतील, जनतेत रोष निर्माण होईल. त्यामुळे सरकार घाबरले आहे. नदी कोरडी ठेवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. घाबरून, आगतिकतेने त्याने ऊस साखर कारखान्यांना घालावा, असे षड्‍यंत्र जाणीवपूर्वक सुरू आहे. मोजक्या भाजपधार्जिण्यांचे कारखाने रडतखडत सुरू आहेत.
राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याकडे दुर्लक्ष करीत मुख्यमंत्री शिक्षक व पदवीधरांच्या निवडणुकीत मश्गुल आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली, बैठक केली. विद्यार्थ्यांच्या दिल्लीच्या आंदोलनात रेल्वे बंद केली, तसे शेतीचे पाणी बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू. साखरेची एमएसपी ठरवा, उसाचा दर जाहीर करा, मगच कारखाने चालवा, एवढीच आमची मागणी आहे.’’ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विभागाच्या पाण्याच्या गैर नियोजनावर त्यांनी हल्ला चढविला. ते म्हणाले, ‘‘सध्या कोयनेत ८९ टीएमसी इतके मुबलक पाणी आहे. मात्र त्याच्या वापराचे जलसंपदा विभागाकडे नियोजन नाही.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एफडीएची राज्यभरात भेसळखोरांवर मोठी कारवाई; १२.७४ कोटींचा माल जप्त, ६८ दुकानांचे परवाने रद्द

संबंधित बातम्या