मेढा तहसील कार्यालयातील झेंडावंदन चौथऱ्याची तोडफोड झाल्याचा प्रकार समोर; प्रशासनाच्या देखरेखीबाबत नागरिकांमधून नाराजी

by Team Satara Today | published on : 25 October 2026


मेढा : मेढा येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील झेंडावंदन चौथऱ्याची तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आल्याने शासकीय मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चौथऱ्यावरील स्टीलचे ग्रील उखडण्यात आले असून, ग्रॅनाइटचेही नुकसान झाले आहे. महत्त्वाच्या ठिकाणाची झालेली दुरवस्था पाहता प्रशासनाच्या देखरेखीबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
तहसील कार्यालयाच्या आवारात रात्रीच्या वेळी काही व्यक्तींकडून मद्यपान केले जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. मद्यपानानंतर रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि कचरा परिसरात टाकला जात असल्याने शासकीय कार्यालयाच्या आवारातील स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. एकीकडे शासकीय मालमत्तेचे नुकसान होत असताना दुसरीकडे परिसरात अस्वच्छता पसरत असल्याने या प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन यांसारख्या राष्ट्रीय सणांच्या वेळी ज्या चौथऱ्यावर शासकीय इतमामात झेंडावंदन केले जाते, त्याच ठिकाणी तोडफोड झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. चौथऱ्यावरील स्टीलचे ग्रील उखडणे आणि ग्रॅनाइटचे नुकसान होणे हा केवळ मालमत्तेच्या नुकसानीचा विषय नसून, सार्वजनिक मालमत्तेच्या देखभालीचाही प्रश्न आहे. या नुकसानीमागील नेमके कारण काय, हा प्रकार कोणी केला आणि शासकीय कार्यालयाच्या आवारात रात्रीच्या वेळी असे प्रकार कसे घडतात, याची चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित यंत्रणेने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तहसील कार्यालयाच्या आवारात रात्रीच्या वेळी होणाऱ्या कथित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित पाहणी करणे, आवश्यकतेनुसार गस्त वाढविणे आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणे गरजेचे आहे. तसेच परिसरात पडलेल्या दारूच्या बाटल्या व कचरा तातडीने हटवून स्वच्छता राखावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी जावलीचे तहसीलदार प्रवीण मुदगुल यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात २७ ऑक्टोबरला राष्ट्रीय जंतनाशक मोहीम; ६ लाख ३१ हजार बालकांना मिळणार डोस
पुढील बातमी
अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी मोहीमेत साताऱ्यात भेसळखोरांवर कारवाई; १ लाख ८७ हजार रुपयांचा माल जप्त

संबंधित बातम्या