वरकुटे-म्हसवड येथे बालविवाह रोखण्यात यश; जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई.

by Team Satara Today | published on : 23 October 2026


सातारा  :  माण तालुक्यातील वरकुटे-म्हसवड येथे दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन कक्ष १०९८ आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून बालविवाह थांबविण्यात यश आले. संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य बालविवाह रोखण्यात यश मिळाले.
वरकुटे-म्हसवड येथे बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन कक्ष १०९८ यांनी पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने आवश्यक ती कार्यवाही केली. संबंधित यंत्रणांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले. या संयुक्त कार्यवाहीमुळे संभाव्य बालविवाह थांबविण्यात यश मिळाले. तसेच सदर बालिकेस व तिच्या पालकांना बालकल्याण समिती समोर हजर करून त्यांना कायद्याविषयी माहिती देण्यात आली व बालविवाह करणे हा कायद्याने अपराध असून त्यास दंड व शिक्षा होऊ शकते याबाबत समुपदेशन करण्यात आले.
बालविवाह प्रतिबंधक कायदा, २००६ नुसार मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्यास संबंधित विवाह बालविवाहाच्या व्याख्येत येतो. बालविवाह रोखणे, बालकांचे संरक्षण करणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही संबंधित यंत्रणांची महत्त्वाची जबाबदारी आहे. बालविवाह ही गंभीर सामाजिक समस्या असून, त्यामुळे बालकांच्या शिक्षणावर, आरोग्यावर तसेच शारीरिक व मानसिक विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. बालकांचे हक्क सुरक्षित ठेवणे आणि त्यांना बालविवाहाच्या दुष्परिणामांपासून संरक्षण देणे या उद्देशाने महिला व बाल विकास विभागा मार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येतात.
बालविवाहमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रशासना सोबत नागरिकांचाही सक्रिय सहभाग आवश्यक आहे. बालविवाहा संदर्भात माहिती मिळाल्यास नागरिकांनी चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच स्थानिक पोलीस प्रशासन किंवा महिला व बाल विकास विभागाला माहिती द्यावी. बातमी देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनिय ठेवले जाते याची दक्षता घेण्यात येते. अशा घटना घडत असल्यास तातडीने संपर्क करावा असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ज्योती लंगुटे यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी "मिशन मुरघास" मोहीम

संबंधित बातम्या