पुणे शिक्षक मतदारसंघात निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंगाचा आरोप; कौस्तुभ गावडेंवर कारवाईची सचिन सानप यांची मागणी

by Team Satara Today | published on : 23 October 2026


पुणे : पुणे शिक्षक मतदारसंघातील मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आचारसंहितेच्या उल्लंघनाचे गंभीर आरोप समोर आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्यावर विरोधी उमेदवार सचिन सानप यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. मतदान केंद्रावर पक्षाची ओळख दर्शवणारा पंचा गळ्यात घालून वावरल्याचा आणि प्रत्यक्ष मतदान करतानाही तोच पंचा गळ्यात असल्याचा आरोप सानप यांनी केला आहे.
मतदान केंद्राच्या परिसरात कोणत्याही पक्षाचे चिन्ह, उपरणे किंवा प्रचार साहित्य बाळगणे हा थेट निवडणूक आचारसंहितेचा भंग मानला जातो. याच नियमाचा हवाला देत कौस्तुभ गावडे यांच्या या कृत्यावर निवडणूक आयोगाने त्वरित दखल घेऊन कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी सचिन सानप यांनी केली आहे.
याशिवाय, भोर परिसरात भाजप आमदारांकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा खळबळजनक आरोपही सचिन सानप यांनी केला आहे. मतदारांना प्रभावित करण्यासाठी बेकायदेशीरपणे पैशांचा वापर केला जात असल्याचा दावा करत या संपूर्ण प्रकरणात निवडणूक आयोगाने गांभीर्याने हस्तक्षेप करावा आणि संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे. सानप यांच्या या आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा पालिकेच्या वसुलीचा कस; ३०.५८ कोटींची तूट भरून काढण्याचे आव्हान
पुढील बातमी
अपघातातील चिंचणेर निंब येथील जखमीचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

संबंधित बातम्या