सातारा : सातारा नगरपालिकेच्या उत्पन्नाचे गणित जुळविण्यासाठी घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीला गती देण्याची गरज निर्माण झाली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी निश्चित केलेल्या ४८ कोटी ७५ लाख रुपयांच्या उद्दिष्टापैकी २३ ऑक्टोबरपर्यंत १८ कोटी १७ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीसाठी पालिकेला अद्याप ३० कोटी ५८ लाख रुपये वसूल करावे लागणार आहेत. उर्वरित कालावधीत ही रक्कम जमा करण्यासाठी प्रशासनाची वसुली मोहीम निर्णायक ठरणार आहे.
पालिकेने चालू आर्थिक वर्षात घरपट्टीतून ४४ कोटी ६७ लाख रुपये आणि पाणीपट्टीतून चार कोटी आठ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित धरले आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत घरपट्टीतून १७ कोटी १७ लाख रुपये, तर पाणीपट्टीतून एक कोटी रुपये जमा झाले आहेत. एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत वसुली ३७.२७ टक्के आहे. म्हणजेच उद्दिष्टातील ६२.७३ टक्के रक्कम अद्याप जमा झालेली नाही.
वसुलीतील ही तफावत भरून काढण्यासाठी पालिकेला थकीत कराच्या वसुलीवर अधिक भर द्यावा लागणार आहे. कर भरण्यास विलंब करणाऱ्या नागरिकांना आर्थिक दंडाचा सामना करावा लागू शकतो. थकीत करावर १६ ऑक्टोबरपासून दरमहा दोन टक्के दंड लागू करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत दंडापोटी ८१ लाख ५७ हजार रुपये जमा झाले आहेत. नागरिकांना कर भरणे सुलभ व्हावे, यासाठी पालिकेचे कर भरणा केंद्र रविवारसह आठवड्यातील सर्व दिवस सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे. मुख्याधिकारी विनोद जळक यांनी थकबाकीदारांनी कराचा भरणा वेळेत करून पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
वसुलीची सद्यस्थिती
एकूण उद्दिष्ट : ४८.७५ कोटी रुपये
आतापर्यंतची वसुली : १८.१७ कोटी रुपये
वसुलीची टक्केवारी : ३७.२७ टक्के
उद्दिष्टपूर्तीसाठी बाकी : ३०.५८ कोटी रुपये
घरपट्टी वसुली : १७.१७ कोटी रुपये
पाणीपट्टी वसुली : १ कोटी रुपये
दंडापोटी जमा : ८१.५७ लाख रुपये
सातारा पालिकेच्या वसुलीचा कस; ३०.५८ कोटींची तूट भरून काढण्याचे आव्हान
घरपट्टी-पाणीपट्टीचे ४८.७५ कोटींचे उद्दिष्ट; थकबाकीदारांना दंडाचा फटका
by Team Satara Today | published on : 23 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा