२२ व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी विनोद कुलकर्णी

मसूर येथे १२ व १३ डिसेंबरला संमेलन; मराठी भाषा व साहित्याच्या प्रसारासाठी सातत्यपूर्ण योगदान

by Team Satara Today | published on : 23 October 2026


सातारा :  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व गुंफण अकादमी (मसूर) यांच्या संयुक्त विद्यमाने मसूर (जि. सातारा) येथे १२ व १३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक कार्यकर्ते विनोद कुलकर्णी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विनोद कुलकर्णी हे पत्रकारिता, साहित्य चळवळ, सहकार आणि मराठी भाषा संवर्धन या क्षेत्रांत दीर्घकाळ कार्यरत आहेत. दैनिक पुण्यनगरीमध्ये सातारा येथे वृत्तसंपादक म्हणून ते कार्यरत असून, यापूर्वी दैनिक ऐक्य या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणूनही त्यांनी १८ वर्षे योगदान दिले आहे. पत्रकारितेतील अनुभवासोबतच साहित्यिक, सामाजिक तसेच सहकार क्षेत्रात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी साताऱ्यातील साहित्य चळवळीला नवी दिशा दिली. मराठी भाषा पंधरवड्याचा उपक्रम सुरू करून मराठी भाषेच्या प्रसारासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नामवंत साहित्यिकांच्या मुलाखती आयोजित करणे आणि साहित्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करणे या माध्यमांतून त्यांनी साहित्यविश्वाशी नाते अधिक दृढ केले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच आधुनिक मराठी कवितेचे जनक बा. सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी आणि त्यांच्या घराच्या नूतनीकरणासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. मराठी भाषा, साहित्य आणि साताऱ्याचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
कुलकर्णी यांनी ‘छोट्या बँकेची मोठी गोष्ट’ या पुस्तकातून सहकार क्षेत्रातील अनुभव शब्दबद्ध केले आहेत. सातारा येथील जनता सहकारी बँकेच्या प्रगतीसाठीही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे येथील कार्यकारिणीतील पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. साताऱ्यात दिमाखात झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनातही कार्याध्यक्ष म्हणून त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे.
गुंफण अकादमीच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारे सद्भावना साहित्य संमेलन हे मराठी साहित्य, सामाजिक सद्भावना आणि सांस्कृतिक समन्वय यांना प्रोत्साहन देणारे व्यासपीठ म्हणून ओळखले जाते. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कुलकर्णी यांची निवड झाल्याने संमेलनाच्या नियोजनाला आणि साहित्यिक उपक्रमांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या बैठकीस गुंफण अकादमीचे अध्यक्ष गजानन चेणगे, संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, प्रसिद्ध रंगकर्मी सुजित शेख, राजीव मुळ्ये, शाहीर धोंडीराम गायकवाड, डॉ. रमेश लोखंडे, सचिन दीक्षित, चंद्रकांत चव्हाण, सतीश पाटील, मोहन सासवडे, जितेंद्र धर्माधिकारी, सूर्यकांत बाजारे, राहुल शेटे, नंदकुमार दीक्षित, विकास भोसले, शांताराम शेटे आदी सदस्य उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा वाहतूक पोलिसांचा दणका; मुजोर थार चालकांच्या गाड्यांवरील 'ब्लॅक फिल्मिंग' जागीच टरटर फाडले

संबंधित बातम्या