५०० कोटींच्या आरोपांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार - ना. शंभूराज देसाई, ग्रुप कॉलची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी

by Team Satara Today | published on : 22 October 2026


सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने ५०० कोटी रुपये घेतल्याच्या मनोज जरांगे-पाटील यांच्या आरोपांची फॉरेन्सिक तपासणी करून सत्यता पडताळावी, अशी मागणी पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी साताऱ्यात केली. ग्रुप कॉलमधील आवाजाची ओळख, संभाषणातील मजकूर आणि त्याची सत्यता तपासल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना देसाई म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी कोणाकडून पैसे घेतले नसल्याचे स्पष्ट केले असून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे पोलीस महासंचालकांमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. पुराव्यांची पडताळणी होण्यापूर्वी निष्कर्ष काढणे योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
२०२२ ते २०२४ या काळात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री असलेल्या शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली होती. त्या वेळी जरांगे यांनी शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले होते. मग गेल्या सहा महिन्यांत असे काय घडले की आता त्यांच्यावर आरोप होत आहेत, असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला. स्थानिक नेत्यांविषयीची नाराजी शिंदे यांच्यावर काढू नये, असेही ते म्हणाले. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाचा उल्लेख करत शिंदे यांची समाजाबाबतची भूमिका कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेच्या दहा जागांसाठी महायुती एकत्र
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जिल्हास्तरावरील दहा जागा महायुती म्हणून लढविण्याचा निर्णय झाल्याचे देसाई यांनी सांगितले. त्यानुसार भाजपला पाच, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन आणि शिवसेनेला दोन जागा देण्यात आल्या आहेत. सोसायटी मतदारसंघातील तालुकानिहाय जागा स्वतंत्रपणे लढविण्यात येणार आहेत. वाई, सातारा आणि खटाव येथील तीन जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित आठ जागांसाठी निवडणूक होणार आहे. पाटण तालुक्यातही पक्ष प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक-पदवीधर निवडणुकीनंतर मतदारांच्या भेटीगाठी सुरू करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा बँकेच्या २८ उमेदवारांना चिन्हवाटप; निवडणुकीतील प्रचाराला येणार वेग
पुढील बातमी
ढोल पथकातून बाहेर पडल्याच्या कारणावरून साताऱ्यात एकास मारहाण; तिघांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या