सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारात सक्रिय होण्याची सूचना केली आहे. तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या विजयासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही नेत्यांच्या शब्दाचा मान राखून शिवसेना डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी प्रयत्न करेल, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ना. देसाई म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव यांना मतदान करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन मेळावा घेण्यासह प्रचारात सक्रिय होण्याची सूचना केली होती. महायुतीमध्ये यापूर्वी घडलेल्या घटनांची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली असून, भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर आपण शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे यांना याबाबत अवगत केले. त्यानंतर ना. शिंदे यांच्या सूचनेनुसार आ. रामराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याशी चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर डॉ. स्मिता जाधव यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष असून, मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेला आदेश शिवसैनिक निश्चितपणे पाळतील, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
दसऱ्याच्या सणाच्या दिवशीही मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार उपस्थित राहिल्याचे सांगून ना. देसाई म्हणाले, निवडणुकीसाठी अद्याप तीन ते चार दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपर्यंत डॉ. स्मिता जाधव यांना मतदान करण्याचा संदेश पोहोचवण्यात येईल. त्यांच्या विजयासाठी संघटितपणे प्रयत्न केले जातील.
‘ना. शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, ही शिवसैनिकाची इच्छा’
ना. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, अशी चर्चा सुरू असल्याबाबत विचारले असता ना. देसाई म्हणाले, प्रत्येक शिवसैनिकाला आपला मुख्य नेता राज्याचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटते. ना. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना झपाट्याने निर्णय घेतले आणि जनतेला दिलासा देणारी अनेक कामे केली. मात्र, सध्या राज्यात शिवसेनेचे संख्याबळ भाजपपेक्षा कमी आहे. शिवसेनेची आमदारसंख्या वाढल्यास ना. एकनाथ शिंदे यांना पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झालेले पाहायला मिळेल, अशी अपेक्षा प्रत्येक शिवसैनिकाची असल्याचेही त्यांनी सांगितले.
दोन्ही नेत्यांच्या शब्दाचा मान राखून शिवसेना डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री शंभूराज देसाई
by Team Satara Today | published on : 22 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा