सातारा जिल्हा बँकेत ९ जागा बिनविरोध; १२ जागांवर चुरशीची लढत

by Team Satara Today | published on : 22 October 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या टप्प्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. सहकारातील वर्चस्व आणि आगामी राजकीय समीकरणे लक्षात घेऊन सर्वपक्षीय नेत्यांनी बिनविरोधचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला. या घडामोडींनंतर बँकेच्या एकूण २१ जागांपैकी ९ जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित १२ जागांसाठी प्रत्यक्ष लढत होणार आहे.  
​महायुतीतील जागावाटपानुसार उर्वरित जागांपैकी भाजपला ५, राष्ट्रवादीला ३ आणि शिवसेनेला २ जागा मिळाल्या आहेत. आता पाटण, फलटण, जावली, माण, खंडाळा, महाबळेश्वर, कराड, कोरेगाव यांसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये हायव्होल्टेज सामने पाहायला मिळणार आहेत.  
​पाटण सोसायटी मतदारसंघात महायुतीचे ना. शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर अशी पारंपारिक लढत रंगणार आहे. माणमध्ये ना. जयकुमार गोरे, शेखर गोरे आणि मनोज पोळ यांच्यात तिरंगी सामना होईल. फलटणमध्ये संजीवराजे ना. निंबाळकर यांच्यासमोर समशेरसिंग ना. निंबाळकर यांचे आव्हान उभे ठाकले आहे. जावलीमध्ये ज्ञानदेव रांजणे विरुद्ध विठ्ठल गोले आणि महाबळेश्वरमध्ये रूपाली राजपुरे विरुद्ध संजय मोरे यांच्यात चुरशीची लढाई होणार आहे.  
​या निवडणुकीत मकरंद पाटील, डॉ. अतुल भोसले, रणजितसिंह ना. निंबाळकर, सर्जेराव सावंत, काका धुमाळ, नंदकुमार मोरे, सत्यजित वीर, ऋतुजा पाटील आणि मंगल पाटील हे ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. दुसरीकडे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खा. नितीन पाटील आणि रामराजे ना. निंबाळकर यांसारख्या अनेक दिग्गज नेत्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.  
​बिनविरोध झालेल्या जागांमुळे महायुतीला काही प्रमाणात यश मिळाले असले, तरी उर्वरित १२ जागांवरील निकालावरच जिल्हा बँकेतील सत्तेचे अंतिम गणित आणि राजकीय वर्चस्व स्पष्ट होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू
पुढील बातमी
फलटणमध्ये बिरदेव यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी; गर्दी, वाद्य व बळी देण्यास मनाई

संबंधित बातम्या