कोयनानगर : कराड-चिपळूण मार्गावर कराटे, ता. पाटण गावाजवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोन जीपचा ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात झाला. या अपघातानंतर एक जीप दरीत तर दुसरी रस्त्याशेजारी उलटली. यात दहा प्रवासी जखमी झाले असून, त्यामध्ये एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास झाला.
शामराव जाधव (रा. नाणेल, ता.पाटण) असे गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. त्यांना पुढील उपचारासाठी पाटण येथून कराडला हलविण्यात आले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही जीप कोयनानगर येथून पाटणच्या दिशेने जात असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका जीप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये एक जीप खोल दरीत गेली, तर दुसरी जीप रस्त्याशेजारी उलटली.
अपघात झाल्याचे समजताच आजूबाजूच्या गावातील लोकांनी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जीपमधून बाहेर काढले. त्यानंतर तातडीने पाटण येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे किरकोळ जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. तर गंभीर जखमी शामराव जाधव यांना पुढील उपचारासाठी कराड येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची रात्री उशिरापर्यंत कोयनानगर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
ओव्हरटेकच्या प्रयत्नात कराटे गावाजवळ एक जीप दरीत, दुसरी उलटली; दहा प्रवासी जखमी
by Team Satara Today | published on : 21 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा