सातारा : माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील सोलर पॅनल प्रकल्पातून लाखो रुपयांच्या केबल वायरची चोरी करणाऱ्या दोघांना म्हसवड पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अटक केली. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील या संशयितांकडून चोरीस गेलेली दोन लाख ५८ हजार रुपये किमतीची केबल वायर जप्त करण्यात आली आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या चोरीचा उलगडा केला.
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वरकुटे मलवडी येथील सोलर पॅनल प्रकल्पातील स्ट्रिंग केबलसह अन्य वायर चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत संबंधित कंपनीच्या सुपरवायझरने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला; मात्र सुरुवातीच्या तपासात चोरट्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता.
गुन्ह्याचा तपास गतिमान करण्यासाठी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि दहिवडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके आणि म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला.
गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आदर्श दत्तात्रय आटपाडकर (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) आणि अजय भीमराव पवार (रा. सांजा, जि. धाराशिव) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी संगनमताने केबल वायर चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत म्हसवड पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पथकाचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी अभिनंदन केले
सोलर प्रकल्पातील केबल चोरीचा छडा; दोघे जेरबंद, म्हसवड पोलिसांची संयुक्त कारवाई; २.५८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
by Team Satara Today | published on : 21 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा