आरळे, वडूथ परिसरातील डीपींमधून सुमारे 130 किलो वजनाची तांब्याची तार चोरीला; सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 20 October 2026


सातारा : सातारा तालुक्यातील आरळे आणि वडूथ परिसरातील वीज वितरणाच्या डीपींमधून सुमारे 130 किलो वजनाची, 55 हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 तारखेला रात्री साडेबारा वाजल्यापासून 18 तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली. आरळे येथील कॅनॉललगत, वडूथ येथील न्यू मोरे वस्ती परिसरातील रस्त्यालगत तसेच आरळे येथील पवार डीपीजवळील उसाच्या शेतातील डीपींमधून अज्ञात चोरट्याने तांब्याची तार चोरून नेली.
या तीन ठिकाणांहून अंदाजे 130 किलो तांब्याची तार चोरीला गेली असून, तिची एकूण किंमत 55 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी वायरमन अमित लक्ष्मण कोळी (वय 35, रा. विकासनगर, सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, अधिक तपास पोलीस हवालदार फणसे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातार्‍यात जावयाकडून सासूचा विनयभंग; मारहाण केल्याचाही आरोप, विनयभंगाचा गुन्हा दाखल
पुढील बातमी
सातार्‍यातील बालनिरीक्षण गृहातून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

संबंधित बातम्या