साडेपाच हजारांच्या दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक; कराड-पाटण मार्ग रोखला, दर दिला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करणार

by Team Satara Today | published on : 19 October 2026


कराड : यंदा ऊसदर आंदोलन चांगलेच पेटले असून ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटना या देखील आक्रमक झाल्या आहेत. रविवारी सायंकाळी शेतकरी कामगार पक्ष, बळीराजा शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, यशवंत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील तांबवे फाटा येथे रस्ता रोको आंदोलन केले.
सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन ५ हजार पाचशे रुपये दर जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तांबवे फाटा येथे रस्त्यावर आंदोलक बसल्याने कराड-पाटण मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी सुमारे अर्धा तास मार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहने अडवून ठेवली होती. यावेळी शेकापचे सातारा जिल्हाध्यक्ष ॲड. समीर देसाई, शेकापचे अमित लाड, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, यशवंत शेतकरी संघटनेचे शिवाजीराव पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे महेश जिरंगे यांच्यासह शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
ऊस दरासाठी शेतकरी संघटनांनी ऊस वाहतूक वाहने अडविण्यास सुरूवात केली आहे. आता शेतकरी रस्त्यावर उतरू लागले आहेत. साडेपाच हजार रुपये दर जाहीर करावा अशी संघटनांची मागणी आहे. हे आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा यावेळी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुष्काळी कामांमध्ये महिलांचा सहभाग समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी : विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर, भुरकवडी वनराई बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ

संबंधित बातम्या