दुष्काळी कामांमध्ये महिलांचा सहभाग समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी : विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर, भुरकवडी वनराई बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ

by Team Satara Today | published on : 19 October 2026


वडूज :  "दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात जलसंधारणाची कामे चालू आहेत. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे; ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. यातून इतर घटकांनी बोध घेऊन जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा" अशी अपेक्षा विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी व्यक्त केली.                 भुरकवडी (ता: खटाव) येथील वनराई बंधाऱ्याच्या कामाप्रसंगी ते बोलत होते. वनराई बंधारा, जलतारा, शोषखड्डे, सलग समतल चर, अनघड  बंधारा, विहीर पुनर्भरण, बोअर पुनर्भरण इत्यादी कामे प्रत्येक गावात चालू आहेत. यासाठी पालक अधिकारी नेमण्यात आले आहेत. गटविकास अधिकारी योगेश कदम आणि सहाय्यक गटविकास अधिकारी जयवंत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर नियोजनातून संपूर्ण तालुक्यात प्रगतिशील कामे चालू आहेत .त्यासोबतच जनजागृती, सामाजिक संस्थांचा सहभाग, विद्यार्थ्यांचा सहभाग, जनजागृतीतून जलजागृतीसाठी शाळांमधून व्याख्याने, पत्रलेखनासारखे उपक्रम राबवले जात आहेत. यातून जनजागृती आणि पाण्याचा वापर कसा करावा याबाबत जलजागृती विविध पातळ्यांवर करण्यात येत आहे.                                                                           भुरकवडीचे याबाबतीत नेमण्यात आलेले पालक अधिकारी म्हणून श्री. क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले," घरातील आणि रानातील कामे सांभाळून गावातील ग्रामस्थ महिला तसेच; बचत गटातील महिला, अंगणवाडी सेविका, आशा सेविका जलसंधारणाच्या कामात योगदान करीत आहेत. हा भारतीय श्रमसंस्कृतीचा गौरव आहे. समाजावर जेव्हा संकट येते तेव्हा योगदान करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे ;असा सकारात्मक संदेश यातून प्रसारित होत आहे. युवक तसेच; महाविद्यालयीन विद्यार्थी इत्यादींनी याबाबत सक्रिय सहभाग नोंदवावा". समन्वयक अण्णा जाधव यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती गायकवाड यांनी संपूर्ण नियोजन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुकुल माधव फाउंडेशनतर्फे सातारा जिल्ह्यात तीन आरोग्य शिबिरे; सेरेब्रल पाल्सीग्रस्त 318 मुलांची तपासणी व उपचारासाठी मार्गदर्शन
पुढील बातमी
साडेपाच हजारांच्या दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक; कराड-पाटण मार्ग रोखला, दर दिला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करणार

संबंधित बातम्या