सातारा : ढेबेवाडी येथील सराफ दुकानात 10 तोळे सोन्याचे दागिने चोरी करुन पळालेल्या दुक्कलीस जेरबंद करण्यात ढेबेवाडी पोलिसांना यश आले आहे. या चोरट्यांकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अमित भिमराव पाटील (वय 39 वर्षे रा.आणे ता.कराड) आणि रोहित नामदेव घाडगे (वय 37 वर्षे रा.विश्रामनगर मलकापूर ता.कराड) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी दुपारच्या सुमारास ढेबेवाडी (मंद्रुळकोळे) ता.पाटण जि.सातारा येथील ढेबेवाडी - सणबुर रस्त्यालगत असलेल्या बाजारपेठेतील मगर बंधु ज्वेलर्स या दुकानातून भरदिवसा चोरट्यांनी दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून दुकानात प्रवेश करून गंठण व राणीहार खरेदी करायचा आहे असे सांगुन दागिने दाखवायला लावले व दुकान मालक त्यांना वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने दाखवित असताना दागिने पाहण्याकरीता म्हणून हातात घेवुन दुकानदाराचे लक्ष नसल्याचे पाहून दागिने हातात घेवुन चोरट्याने दुकानातून पळ काढला व ढेबेवाडी चौकात मोटारसायकल घेवुन उभा असलेला त्याचा साथीदार त्याच्या पाठीमागे गाडीवर बसुन दोघांनी दागिन्यांसह दिवशी घाट रस्त्याने घाटातून नवारस्ता बाजुला पळून गेलेले होते.
घटनेबाबत पोलीस ठाण्यास माहिती प्राप्त झाल्यावर तात्काळ पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली. त्यानंतर सराफ दुकानदार विनोद मगर यांनी पोलीस ठाणेस रितसर तक्रार दाखल केल्यावर संबंधितांवर गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला.
ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने तांत्रिक माहिती व गोपनिय बातमीदारांचे मार्फत तपास करून गुन्हा दाखल झाल्यापासून 48 तासांचे आत आरोपींचा शोध लावला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेले एकूण दहा लाख रुपये किंमतीचे 10 तोळे सोन्याचे दागिने व गुन्हा करताना वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आलेली आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या सूचनेप्रमाणे पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदाम पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांचे मार्गदर्शनाखाली ढेबेवाडी पोलीस ठाणे कडील सहा.पोलीस निरीक्षक प्रविण दाईंगडे, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित चव्हाण, पो.हवा.प्रशांत चव्हाण, पो.हवा. नवनाथ कुंभार, पो.कॉ. प्रशांत माने, पो.कॉ.सौरभ कांबळे, पो.कॉ.माणिक पाटील, पो.कॉ.संकेत पाटील, पो.कॉ.गणेश किर्वे ,पो.कॉ. उज्वल कदम, पो.कॉ.माणिक थोरात, पो.कॉ.विकास पाटील तसेच सायबर पोलीस ठाणे सातारा यांनी केला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित चव्हाण करीत आहेत.
ढेबेवाडी येथील सराफ दुकानात 10 तोळे सोन्याचे दागिने चोरणारी दुक्कल जेरबंद; 48 तासांत ठोकल्या बेड्या, सर्व मुद्देमाल हस्तगत
by Team Satara Today | published on : 19 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा