फटाक्यांऐवजी पुस्तकांचा प्रकाश खरा; हिरवाई प्रकल्पाच्या वतीने यंदा ‘पर्यावरणीय दिवाळी’ साजरी, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भेटवस्तू, गोड फराळाचा घेतला आनंद

by Team Satara Today | published on : 18 October 2026


सातारा : दिवाळीचा आनंद साजरा करतानाच पर्यावरण संवर्धनाची जाणीव मुलांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने हिरवाई प्रकल्पाच्या वतीने यंदा ‘पर्यावरणीय दिवाळी’ साजरी करण्यात आली. ‘फटाके की पुस्तके?’ या कवितेच्या सादरीकरणापासून ते पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्यापर्यंत विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी यंदा एकही फटाका न उडविण्याचा उत्स्फूर्त संकल्प केला.
या कार्यक्रमाला मुक्तागिरी मुक्तांगण सोशल फाउंडेशनच्या संचालिका अपर्णा अनिल देसाई आणि गीता मामणिया प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. लोकमंगल हायस्कूल, एमआयडीसी कोडोली, यशदायीनी विद्यामंदिर, नगरपालिका शाळा क्रमांक ११ आणि नगरपालिकेची उर्दू शाळा क्रमांक १२ या शाळांतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रुतिका चौगुले आणि धनंजय चौगुले यांनी ‘फटाके की पुस्तके?’ ही कविता सादर केली. या कवितेच्या माध्यमातून फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि पुस्तकांचे महत्त्व यांवर विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना कागदी पणत्या आणि आकाशकंदील तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविधरंगी आकाशकंदिलांवर वृक्षलागवड, पाणी बचत, पर्यावरण संवर्धन आणि फटाकेमुक्त दिवाळीचे संदेश लिहिले. याशिवाय याच विषयांवर चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आल्या.
हिरवाई प्रकल्पाच्या प्रा. संध्या चौगुले यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाची २५ वर्षांची परंपरा विशद केली. कातकरी वस्तीतील मुलांसोबत सुरू झालेला हा दिवाळी उपक्रम आजही सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुलांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देणे आणि पर्यावरणाप्रति संवेदनशीलता निर्माण करणे, हा यंदाच्या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अपर्णा देसाई म्हणाल्या, “अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून दिवाळी हा केवळ दिव्यांचा उत्सव न राहता सामाजिक जाणीवा रुजविण्याचे महत्त्वाचे काम हिरवाईच्या माध्यमातून होत आहे.” शाळांनी प्रार्थनेच्या वेळी परिपाठातून दररोज थोडा वेळ अशा पर्यावरणविषयक जाणीवा रुजविण्यासाठी दिल्यास मोठा सकारात्मक बदल घडू शकतो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
गीता मामणिया यांनी पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांचे महत्त्व सांगितले. या निसर्गघटकांचा आदर करून पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘फटाकेमुक्त दिवाळी का साजरी करावी?’ या विषयावर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपली मते मांडली. चर्चेतून फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनिप्रदूषण, तसेच पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. या उपक्रमातून प्रेरणा घेत सर्व विद्यार्थ्यांनी यंदा एकही फटाका न उडविण्याचा संकल्प केला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी हिरवाईच्या गर्द सावलीत शैक्षणिक भेटवस्तू आणि गोड फराळाचा आनंद घेतला. पर्यावरण संवर्धनाचे संस्कार, सर्जनशीलतेला प्रोत्साहन आणि सामाजिक जाणीव यांची सांगड घालत यंदाची दिवाळी विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी ठरली. श्रुतिका चौगुले यांनी सूत्रसंचालन केले, तर तानाजी मस्के यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीपाली मोरे, शीतल इंगुळकर, दिया खांडेकर, वैशाली ढोले, शेख रफत अंजुम सय्यद हसन अली आणि बाळकृष्ण इंगळे यांनी सहकार्य केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा; खासगी आस्थापनातील मतदारांना दोन ऐवजी चार तासाची विशेष सवलत

संबंधित बातम्या