कॉंग्रेस, डाव्या पक्षांच्या खोट्या नॅरेटिव्हला बॅलेट पेपरमधून उत्तर द्या - ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे आवाहन, शेंद्रे येथे शिक्षक-पदवीधर मेळाव्याला उदंड प्रतिसाद

by Team Satara Today | published on : 18 October 2026


सातारा : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड सुरू आहे. मात्र, कॉंग्रेस आणि डावे पक्ष खोटे नॅरेटिव्ह पसरवून तरुणांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. संविधानिक संस्थांवर आरोप करून देशात अस्थिरता निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. ईव्हीएमबाबत आक्षेप घेणार्‍या विरोधकांना आता बॅलेट पेपरद्वारे होणार्‍या मतदानातून उत्तर देण्याची संधी आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना पहिल्या पसंतीचे मतदान करून प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शेंद्रे येथील स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक संकुलात शिक्षक व पदवीधरांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शिवेंद्रराजे बोलत होते. मेळाव्याला शिक्षक, पदवीधर आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, विरोधकांकडून ईव्हीएम हॅक होत असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. संविधानिक संस्थांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचे काम विरोधकांनी केले आहे. आंदोलनांच्या माध्यमातून सत्तापालट करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून मतदारांनी या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे.
डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे हे दोन्ही उमेदवार सातारा जिल्ह्याशी आपुलकीचे नाते असलेले आहेत. डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील अनेक कुटुंबे जोडली गेली आहेत. त्याचप्रमाणे ’पुढारी’चे संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील ’पुढारी’ परिवाराशी जिल्ह्याचे गेल्या चार दशकांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सैनिक, ऊस उत्पादक शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न ’पुढारी’ने सातत्याने मांडले. प्रसंगी आमच्या विरोधातही परखड भूमिका घेण्याचे धाडस या वृत्तपत्राने दाखवले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
ते पुढे म्हणाले, आम्ही अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये काम केले. जिल्ह्यात आठ आमदार असतानाही मंत्रिपदाच्या बाबतीत जिल्ह्याला अपेक्षित न्याय मिळाला नाही. जिल्हा बँक, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर सत्ता असूनही पक्षाच्या नेतृत्वाने आमचा विचार केला नाही. आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भाजपचा गड बनला आहे. भाजपने जिल्ह्याला विविध माध्यमांतून विकासाची संधी दिली आहे. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना पहिल्या पसंतीचे मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे.
डॉ. स्मिता जाधव म्हणाल्या, या निवडणुकीसाठी सातार्‍याच्या दोन्ही महाराजांचे आशीर्वाद मिळाले आहेत. पदवीधरांना न्याय मिळवून देण्याच्या ध्येयाने मी काम करणार आहे. गेली 25 वर्षे मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, तरुणांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवाचाही पदवीधरांच्या प्रश्नांसाठी उपयोग करून घेणार आहे.
पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव आणि पती डॉ. योगेश जाधव यांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न प्रभावीपणे कसे मांडायचे आणि व्यवस्थेकडून ते कसे सोडवून घ्यायचे, हे शिकायला मिळाले. याच अनुभवाच्या आधारे पदवीधरांसाठी कौशल्य विकास केंद्रे, उद्योजकता प्रशिक्षण केंद्रे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे आणि युवकांसाठी मानसिक स्वास्थ्य केंद्रे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून पहिली महिला आमदार निवडून आणण्याची संधी मतदारांनी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, सातारा जिल्ह्यात महायुतीची स्थिती भक्कम आहे. जिल्ह्यात पदवीधर मतदारांची सुमारे 47 हजार नोंदणी झाली असून, 90 टक्के मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. स्मिता जाधव सक्षमपणे काम करतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्‍वासाला पात्र ठरण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते मतांच्या माध्यमातून मोठी भेट देतील, असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे म्हणाल्या, भाजपने पदवीधर मतदारसंघासाठी सक्षम महिला उमेदवार दिली आहे. डॉ. स्मिता जाधव यांचे महिलांचे संघटन मजबूत असून, ‘पुढारी कस्तुरी क्लब’च्या माध्यमातून त्यांनी दूरदृष्टीने काम केले आहे. सातारा जिल्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, शेंद्रे येथील मेळावा त्यांच्या विजयाची नांदी ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले यांनी प्रास्ताविक केले. मतदान प्रक्रिया कशी असेल आणि मतदान कसे करावे, याची माहिती अविनाश कदम यांनी दिली.
या मेळाव्यास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, मदन भोसले, वसंतराव मानकुमरे, सुनील काटकर, नगराध्यक्ष अमोल मोहिते, अविनाश कदम, विठ्ठल बलशेठवार, विकास गोसावी, अजित साळुंखे, तेजस्विनी घोरपडे, सभापती महेश गाडे, सौरभ शिंदे, दिलीप बाबर, ज्ञानदेव रांजणे, रामकृष्ण वेताळ, प्रा. अजिंक्य सगरे, अमित कुलकर्णी, कांचन साळुंखे, हर्षल चिकणे, कामेश कांबळे, शैला शिंदे आदी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिक्षक भारतीचा सचिन सानप यांना अधिकृत पाठिंबा; उर्दू शाळांतील शिक्षकांना सानप यांना मतदानाचे अब्दुल सत्तार यांचे आवाहन
पुढील बातमी
आता कामगिरी दाखवा, अनुदान मिळवा; ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांसाठी १६ व्या वित्त आयोगाचे कडक निकष

संबंधित बातम्या