मंगेश चिवटे म्हणजेच सचिन सानप; शिक्षक मतदारसंघासाठी मंगेश चिवटेंकडून सचिन सानप यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा, शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा

by Team Satara Today | published on : 17 October 2026


सोलापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर येथे शिवसेनेने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार सचिन नवनाथ सानप आणि मंगेश चिवटे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शिक्षकांच्या प्रश्नांवर भाष्य करत मंगेश चिवटे यांनी सचिन सानप यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला.
शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा या भूमिकेचा पुनरुच्चार करत मंगेश चिवटे म्हणाले की, मंगेश चिवटे म्हणजेच सचिन सानप असे समजून शिक्षकांनी सचिन सानप यांना पहिल्या पसंतीचे मतदान करून विजयी करावे. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करण्याची जबाबदारी आम्ही दोघेही संयुक्तपणे पार पाडू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शिक्षकांनी मतदानाच्या दिवशी सचिन सानप यांना प्रथम पसंतीचे मत देऊन भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी सचिन सानप म्हणाले की,  गेल्या सोळा वर्षांपासून शिक्षक संघटनांच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करत आहे. शिक्षक संघटनांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्‍वासामुळेच मी उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याबद्दल बोलताना सानप म्हणाले की, एका सामान्य शिक्षकावर विश्‍वास दाखवत त्यांनी शिक्षकांच्या स्वाभिमानाचा सन्मान करणारा निर्णय घेतला आहे. त्यांनी शिक्षकांची नाडी अचूक ओळखली. ही निवडणूक नाशिक पॅटर्न’ आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला असता सानप यांनी, हा शिक्षकांचा पॅटर्न आहे. हा शिक्षकांच्या सन्मानाचा निर्णय आहे, असे स्पष्ट केले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, शिक्षकांचा आमदार हा शिक्षकांच्या प्रश्नांची सखोल जाण असलेला असावा. संचमान्यता, नवीन शैक्षणिक धोरण, सीएचबी शिक्षकांचे प्रश्न तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध धोरणात्मक बाबी समजून घेऊन त्यावर प्रभावीपणे भूमिका मांडणारा प्रतिनिधी विधान परिषदेत असणे आवश्यक आहे. संस्थाचालक नव्हे, तर स्वतः शिक्षक म्हणून काम केलेला आणि शिक्षकांच्या वेदना, अपेक्षा व प्रश्न समजणारा व्यक्तीच शिक्षकांचा आमदार व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा झेडपी अध्यक्षांच्या जात प्रमाणपत्रावर लवकरच निर्णय, दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तीवाद पूर्ण
पुढील बातमी
महाराष्ट्रात स्वतंत्र आयुष विभाग सुरू करा; आयुर्वेदिक उत्पादकांची मागणी

संबंधित बातम्या