सातारा : राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पिण्याचे आणि जनावरांच्या पाण्याला अतिप्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार ऑगस्ट २०२७ पर्यंत धरणातील पाणी राखीव ठेवून शिल्लक असल्यास त्याचे शेतीसाठी आवर्तन करण्यात येईल. तसेच टंचाईमुळे मागणी आणि गरज असल्यास गावांना २४ तासांत पाण्याचे टॅंकर सुरू करू, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीबाबत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सातारा येथील निवासस्थानी पालकमंत्री देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी राज्यातील दुष्काळी स्थिती आणि सातारा जिल्ह्यातील परिस्थिती, उपायोजनांबाबत माहिती दिली. तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्यात कोयना धरण सर्वाधिक मोठे आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात पाच टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर चिंता व्यक्त केली आहे. आता जिल्ह्यातील सर्व धरणांचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर जिल्ह्यातील मंत्री आणि सर्व आमदारांना बरोबर घेऊन पाण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
दुष्काळामुळे पाणी टॅंकरचीही मागणी वाढत आहे. यासाठी कितीही लांबून आणि कितीही खर्च करून पाणी आणून लोकांना देणार आहोत. लोकांना टंचाई भासणार नाही याची काळजी घेण्यात येईल. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आला तर त्यासाठीही उपाययोजना सुरू आहेत. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर कोकणातील हिरवा चारा खरेदी करून आणण्याबाबत प्रयत्न राहणार आहेत. या दुष्काळात शासन निधी देण्यास कुठेही कमी पडणार नाही.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे आणि जनावरांच्या पाण्याला अतिप्रथम प्राधान्य - पालकमंत्री शंभूराज देसाई; सर्व आमदारांना बरोबर घेऊन पाण्याचा आराखडा तयार करण्यात येणार
by Team Satara Today | published on : 17 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा