उंब्रज : पुणे-बेंगळुर राष्ट्रीय महामार्गावर कोर्टी, ता. कराड गावच्या हद्दीत तारळी नदीच्या पुलाशेजारी रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला कार धडकल्याने कारने पेट घेतला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. उंब्रज पोलिसांच्या तत्परतेने कार मधून प्रवास करणाऱ्या पाच जणांना सुखरूप बाहेर काढले. यामध्ये तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. सदरची घटना शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सातारा हून ईश्वरपूर येथे जाणारी कार (क्रमांक एम.एच. १२ एच.झेड. ७००२) ही कोर्टी गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने कार तारळी नदीच्या पुला शेजारी रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला धडकली. या धडकेत कारने अचानक पेट घेतला. या कार मधून प्रवास करणारे दोन पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुले ही कारमध्ये अडकली होती. घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलीस ठाण्याचे जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक फौजदार अभय भोसले, हवालदार संजय धुमाळ भोसले, वैभव डांगरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस ठाण्यात उपलब्ध असलेल्या अग्निशमन यंत्राच्या (फायर एक्स्टिंग्विश) सहाय्याने कारला लागलेली आग विझविण्यात यश आले.त्यानंतर गाडीत अडकलेल्या पाचही जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. कार मधील तीन जण किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्गावर कोर्टी गावच्या हद्दीत कठड्याला धडकून कार पेटली; तीन जण किरकोळ जखमी
by Team Satara Today | published on : 17 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा