नवदुर्गेच्या रूपांतून समाजक्रांतीचा जागर; कामेश कांबळे यांच्याकडून ९ कर्तृत्ववान क्रांतीज्योतींना अभिवादन

by Team Satara Today | published on : 17 October 2026


सातारा : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सातारा जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे सदस्य कामेश विजया दिलीप कांबळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या राजमाता, क्रांतिकारक आणि अग्रगण्य समाजसुधारक क्रांतीज्योतींना अनोखी आदरांजली वाहिली आहे. नवदुर्गेच्या शक्तीला प्रत्यक्ष रणरागिणींच्या कर्तृत्वाची आणि संघर्षाची जोड देणारा हा डिजिटल उपक्रम सध्या सोशल मीडियावर सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे.
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जात असतानाच, कांबळे यांनी समाजात समता, शिक्षण, स्वाभिमान आणि मानवी हक्कांसाठी अखंड लढा देणाऱ्या नऊ महानायिकांच्या विचारांची ओळख नव्या पिढीला करून दिली. या संकल्पनेनुसार पहिल्या दिवशी स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ, दुसऱ्या दिवशी स्त्रीशिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तिसऱ्या दिवशी पुरुषप्रधान विषमतेविरुद्ध निर्भीड लढा देणाऱ्या ताराबाई शिंदे, चौथ्या दिवशी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इतिहास घडवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, पाचव्या दिवशी स्त्रीशिक्षण व स्वावलंबनाचा मार्ग दाखवणाऱ्या पंडिता रमाबाई, सहाव्या दिवशी शोषित-आदिवासींच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या गोदावरी परुळेकर, सातव्या दिवशी स्त्री सक्षमीकरणाचा पाया रचणाऱ्या रमाबाई रानडे, आठव्या दिवशी अन्यायाविरुद्ध परखड सवाल विचारणाऱ्या मुक्ता साळवे आणि नवव्या दिवशी स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेण्याच्या अधिकारासाठी ठाम राहिलेल्या डॉ. रखमाबाई राऊत यांच्या प्रेरक जीवनप्रवासाचा गौरव करण्यात आला.
प्रत्येक दिवसाच्या विशिष्ट रंगांची सांगड घालून या क्रांतीज्योतींचे विचार आणि त्याग आकर्षक डिजिटल पोस्टरच्या माध्यमातून घराघरांत पोहोचवण्यात आले. नवरात्र म्हणजे केवळ कर्मकांड नसून समाजातील प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, स्वाभिमानाचा आणि कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा उत्सव आहे, हा व्यापक विचार या उपक्रमातून समोर आला असून नेटिझन्सकडून या वैचारिक व अभ्यासपूर्ण जागरचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नवे राजकीय समीकरण; सचिन सानप यांना शिवसेनेचा पाठिंबा

संबंधित बातम्या