पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत नवे राजकीय समीकरण; सचिन सानप यांना शिवसेनेचा पाठिंबा

शिक्षक संघटनांच्या पाठबळामुळे सानप यांची ताकद वाढली; विजयाचा व्यक्त केला विश्वास

by Team Satara Today | published on : 17 October 2026


सातारा  : पुणे विभाग शिक्षक विधान परिषद निवडणूक २०२६ मध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपचे कौस्तुभ गावडे निवडणुकीच्या रिंगणात असतानाच शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. शिक्षक संघटनांच्या पाठबळानंतर शिवसेनेची साथ मिळाल्याने सानप यांची ताकद वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
‘शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा’ हा नारा घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सानप यांना स्पुक्टासह अनेक शिक्षक संघटनांनी अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. शिक्षकांचे प्रश्न आणि प्रलंबित मागण्या विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी शिक्षकांमधीलच प्रतिनिधी निवडून देण्याच्या भूमिकेतून त्यांच्या उमेदवारीला बळ मिळत आहे. त्यातच शिवसेनेने जाहीरपणे पाठिंबा दिल्याने त्यांच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली आहे.
शिवसेनेचे नेतेही सानप यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाले आहेत. सोलापूरमध्ये मंगेश चिवटे यांच्या पुढाकारातून शिक्षकांचा भव्य मेळावा आयोजित केला जात असून, शंभूराज देसाई कोल्हापूरमध्ये निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे समर्थन प्रत्यक्ष प्रचारातही उतरल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सचिन सानप यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. शिक्षक संघटनांचे पाठबळ आणि शिवसेनेची साथ यामुळे आपली बाजू भक्कम झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्वराज ग्रीन पॉवरला सलग दुसऱ्या वर्षी ‘इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड’
पुढील बातमी
नवदुर्गेच्या रूपांतून समाजक्रांतीचा जागर; कामेश कांबळे यांच्याकडून ९ कर्तृत्ववान क्रांतीज्योतींना अभिवादन

संबंधित बातम्या