सातारा : महाविद्यालयीन परिसरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सातारा शहर वाहतूक शाखेने गुरुवारी सकाळी विशेष तपासणी मोहीम राबवली. वाय. सी. कॉलेज, छत्रपती शिवाजी कॉलेज आणि डी. जी. कॉलेज परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत अवघ्या एका तासात ६२ वाहनचालक वाहतूक नियमांचा भंग करताना आढळले. त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून एकूण ६० हजार ३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
महाविद्यालयांच्या परिसरात वाहनांची वाढती वर्दळ, बेशिस्त वाहनचालक आणि नियमांकडे होणारे दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी अचानक तपासणी केली. गुरुवारी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळेत राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले.\
पालकांनीही जबाबदारी ओळखावी
वाहतुकीचे नियम पाळणे ही प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी असून, निष्काळजीपणामुळे स्वतःसह इतरांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वाहन चालविताना आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी केले.
विशेषतः पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी किंवा अन्य वाहने देऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले. अल्पवयीन मुलांकडून होणारे नियमभंग टाळण्यासाठी पालकांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
शहरात तपासणी मोहीम सुरूच राहणार
वाहतुकीची शिस्त राखण्यासाठी शहरातील विविध भागांत यापुढेही अचानक तपासणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
महाविद्यालय परिसरात पोलिसांचा वॉच; तासाभरात ६२ वाहनचालकांना दंड, वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
by Team Satara Today | published on : 15 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा