नागठाणे आरोग्य केंद्राला याशनी नागराजन यांची भेट; आरोग्यसेवेचा घेतला आढावा, प्रशिक्षणाचे केले कौतुक; समग्र आरोग्य सेवा प्रशिक्षणाची केली पाहणी

by Team Satara Today | published on : 15 October 2026


सातारा : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सर्वसमावेशक आणि प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेत जिल्हा परिषद साताऱ्याच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी आज प्राथमिक आरोग्य केंद्र, नागठाणे येथे अचानक भेट देऊन पाहणी केली.   यावेळी त्यांनी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवा, औषधसाठा, स्वच्छता आणि केंद्रातील एकूण कामकाजाची माहिती घेतली. तसेच, आयुष्यमान  भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण सत्रास भेट देत प्रशिक्षणाचा लाभ ग्रामीण जनतेच्या आरोग्यहितासाठी प्रभावीपणे घेण्याचे आवाहन केले.या भेटीवेळी सातारा जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. अजित साळुंखे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
रुग्णसेवेचा घेतला आढावा; रुग्णांशी साधला थेट संवाद
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी  नागराजन यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विविध विभागांची पाहणी करून रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती घेतली. केंद्रातील औषधसाठा, परिसरातील स्वच्छता आणि आरोग्यसेवांच्या अंमलबजावणीची स्थिती याबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी उपचारासाठी आलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. आरोग्यसेवा देताना रुग्णांच्या गरजांना प्राधान्य देण्यासह उपलब्ध सुविधांचा प्रभावी वापर करण्याचे महत्त्वही या भेटीतून अधोरेखित झाले.
समग्र प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षणाची केली पाहणी
प्राथमिक आरोग्य केंद्र नागठाणे येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या आयुष्मान भारत उपक्रमांतर्गत समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary Health Care – CPHC) या विषयावरील प्रशिक्षण सत्र सुरू होते. या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका, गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशिक्षण सत्रास भेट देऊन प्रशिक्षणातील विषय, त्याची उपयुक्तता आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतली. उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान प्रत्यक्ष क्षेत्रीय कामकाजात उपयोगात आणण्याचे आणि ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत अधिकाधिक गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचविण्याचे निर्देश दिले.समग्र प्राथमिक आरोग्य सेवा ही ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाची असून, प्रशिक्षणातून विकसित होणारी कौशल्ये आणि ज्ञान यांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रशिक्षणाच्या आयोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहनही दिले.
आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाबाबत समाधान
या प्रशिक्षणासाठी डॉ. अरुंधती कदम, डॉ. सुदर्शन मेहता, डॉ. विजया जगताप, श्री. रवींद्र कुलकर्णी, श्री. सुभाष जाधव, श्रीमती मीना चौधरी आदी उपस्थित होते.प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाज, रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि समग्र प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी समाधान व्यक्त केले. आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रभावी वापर करून ग्रामीण जनतेला अधिक सक्षम, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून द्याव्यात, असा संदेश या भेटीतून देण्यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांची शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती
पुढील बातमी
दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा देण्याची सरकारची तयारी; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती; पाच हजारांच्या अग्रिम मदतीसाठी सहा हजार कोटींचे गणित

संबंधित बातम्या