मानव हाच ‘विकसित भारता’चा केंद्रबिंदू : डॉ. बालाजी गोपालन; ज्येष्ठ उद्योजक फरोख कुपर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

पालकमंत्री शंभूराज देसाई यांची उपस्थितीत सातारा येथे एनआयपीएम पश्चिम विभागीय परिषद उत्साहात

by Team Satara Today | published on : 15 October 2026


सातारा : भविष्यातील विकसित भारताच्या जडणघडणीत तंत्रज्ञानाचा वेग कितीही वाढला, तरी माणूस आणि मानवी मूल्ये हाच विकासाचा मुख्य केंद्रबिंदू असतील, असे ठाम प्रतिपादन 'करारो इंडिया'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बालाजी गोपालन यांनी केले.
मानव संसाधन क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट' (NIPM) या अग्रगण्य संस्थेची पश्चिम विभागीय परिषद नुकतीच साताऱ्यातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात दिमाखात पार पडली. या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पश्चिम भारतातील नामांकित उद्योगांमधील ९०० हून अधिक एचआर तज्ज्ञ, व्यवस्थापक आणि उद्योगप्रमुखांनी या परिषदेला उपस्थिती लावली होती.
परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. शंभूराज देसाई यांनी विशेष उपस्थिती दर्शवून परिषदेत देशभरातून जमलेल्या प्रतिनिधींना (डेलिगेट्स) मार्गदर्शन केले. औद्योगिक प्रगतीमध्ये मनुष्यबळाचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे नमूद करत त्यांनी सातारा येथे अशा भव्य राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संयोजकांचे विशेष कौतुक केले.
या उद्घाटन सोहळ्यास डॉ. बालाजी गोपालन, विलो मेदर प्लॅटचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत वाठवे, एसीजी वर्ल्ड लिमिटेडचे ग्रुप सीईओ निखिल कुलकर्णी, एनआयपीएम रत्न डॉ. संतोष भावे, यशस्वी ग्रुपचे श्री. विश्वेश कुलकर्णी, यशोदा ग्रुपचे डॉ. अजिंक्य सगरे, भारतीय लष्कराचे निवृत्त मेजर जनरल अमर कृष्णा, एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष पी. आर. बसवराजू, अतिरिक्त सरचिटणीस रॉबर्ट कुटिन्हा, कोषाध्यक्ष अमृता करमरकर, डॉ. नरेंद्र पाटील, परिषदेचे संयोजक तथा कूपर कॉर्पोरेशनचे सीएचआरओ डॉ. नितीन देशपांडे, सातारा चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. उदय भोसले, राष्ट्रीय कौन्सिल सदस्य अभय खुरुसाळे आणि उपसंयोजक धैर्यशील देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
अधिकाधिक युवकांना रोजगाराभिमुख कसे करता येईल यावर मंथन
‘एचआर कॅलिडोस्कोप : शेपिंग ह्यूमन कॅपिटल जर्नी टुवर्ड्स भारत @ १००’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या परिषदेत चार प्रमुख स्तंभांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. यामध्ये टेक्नॉलॉजी लेन्सच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ऑटोमेशनच्या युगात आधुनिक तंत्रज्ञान व मानवी कार्यक्षमतेची योग्य सांगड घालून उत्पादकता वाढवण्यावर भर देण्यात आला. द पीपल्स लेन्स अंतर्गत कामाच्या ठिकाणी विविध पिढ्यांतील कर्मचाऱ्यांमध्ये उत्तम मेळ घालून त्यांच्या एकत्रित ऊर्जेचा राष्ट्रविकासासाठी विनियोग करण्यावर उहापोह झाला. लीडरशिप लेन्समध्ये एचआर क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उद्योगांच्या धोरणात्मक निर्णयात आणि सर्वांगीण वाढीत सक्रिय योगदान वाढवण्यावर मार्गदर्शन करण्यात आले, तर कॅपेबिलिटी लेन्सच्या माध्यमातून उद्योगांमधील कौशल्यांची तूट भरून काढून अधिकाधिक युवकांना रोजगाराभिमुख कसे करता येईल, यावर मंथन झाले.
नामवंतांचे  विविध विषयांवर सादरीकरण करून उपस्थितांना मार्गदर्शन
दिवसभर चाललेल्या विविध तांत्रिक सत्रांमध्ये पारी लिमिटेडचे ग्लोबल सीएचआरओ डॉ. अमित चौधरी, बीओएटी (BOAT) बोर्डाचे डेप्युटी डायरेक्टर श्री. वडोदे, एचपीसीएलचे मुख्य महाव्यवस्थापक सुनील सानस, रेनमेटलचे कार्यकारी संचालक विक्रम मस्के, एल अँड एल प्रॉडक्ट्सचे संचालक (एचआर) लक्ष्मण भोसले, फोसेको इंडियाच्या संचालक (एचआर) प्राची सोनचल, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शनचे जीपीएचआर प्रशांत आंबुळगेकर, यशदाचे प्रकल्प संचालक विश्राम देशपांडे, स्कोडा ऑटोचे ईआर कम्प्लायन्स हेड रामहरी कुटे, रीटर इंडियाच्या उपाध्यक्षा (एचआर) मोनाली रिंघे, फियाट इंडिया ऑटोमोबाईल्सचे महाव्यवस्थापक (एचआर) डॉ. गौतम भोसले, थर्मॅक्स लिमिटेडच्या ग्रुप एचआर हेड प्राजक्ता जोशी, माइंड वर्क्सचे सीईओ डॉ. संग्रामसिंग पवार आणि टॅलेंट फायंडेक्सचे संस्थापक डॉ. मानस देवान या नामवंतांनी विविध विषयांवर सादरीकरण करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
समारोप कार्यक्रमात परिषदेचे संयोजक डॉ. नितीन देशपांडे यांनी दिवसभरातील सत्रांचा आणि विचारमंथनाचा सर्वसमावेशक आढावा घेतला. या सत्रात १०० वर्षांहून अधिक काळाची औद्योगिक परंपरा लाभलेल्या 'कुपर कॉर्पोरेशन'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. फरोख नरीमन कुपर यांना एनआयपीएमच्या वतीने मानाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. श्री. फरोख कुपर यांच्या वतीने कंपनीचे संचालक श्री. जाल कुपर यांनी हा पुरस्कार स्वीकारला आणि मनोगत व्यक्त करताना श्री. फरोख कुपर यांच्या ५८ वर्षांच्या प्रदीर्घ व प्रेरणादायी औद्योगिक कारकिर्दीचा प्रवास उलगडला.
मानवी संसाधनाचे महत्त्व अधोरेखित करत परिषदेचा उत्साहात समारोप
संपूर्ण कार्यक्रमाचे मास्टर ऑफ सेरेमनी म्हणून श्रीमती वहीदा पठाण यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. ही परिषद यशस्वी करण्यासाठी एनआयपीएम सातारा सह्याद्री चॅप्टरच्या १०० हून अधिक सदस्यांनी श्री. महेश खरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष परिश्रम घेतले. उद्योग क्षेत्रातील भावी आव्हानांवर उपायांची दिशा निश्चित करत आणि मानवी संसाधनाचे महत्त्व अधोरेखित करत या भव्य परिषदेचा अत्यंत उत्साहात समारोप झाला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अरुण गोडबोले म्हणजे सातारचे नाव जगभर नेणारा माणूस - प्रा .नितीन बानुगडे पाटील; 'उषा-अरुण' स्मृती पुरस्कार श्रीकांत कात्रे, डॉ.राजेंद्र माने यांना प्रदान
पुढील बातमी
राज्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू वासोटा किल्ला पर्यटनासाठी खुला; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांची माहिती

संबंधित बातम्या