अरुण गोडबोले म्हणजे सातारचे नाव जगभर नेणारा माणूस - प्रा .नितीन बानुगडे पाटील; 'उषा-अरुण' स्मृती पुरस्कार श्रीकांत कात्रे, डॉ.राजेंद्र माने यांना प्रदान

by Team Satara Today | published on : 14 October 2026


सातारा : सातारा शहरातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले अरुणराव गोडबोले यांच्या नावापुढे स्वर्गीय शब्द लावण अजूनही मनाला पटत नाही. कारण साताऱ्यातून माणसे जगभर गेली ,मात्र सातारचे नाव जगभर नेण्याचे भव्य दिव्य असे काम स्वर्गीय अरुण काकांनी केले. माणसे स्वतःपुरते पाहतात ,हे बाजूला ठेवून अरुण काकांनी दिवे लावत रस्त्यावर नेले, संपूर्ण समाजात नेले आणि पेटते दिवे कसे कायमस्वरूपी तेज देत राहतील याचे अतिशय मोलाचे काम त्यांनी केले. समाज प्रकाशित करण्याचे त्यांची भूमिका खरोखरच ही आदर्श अशी आहे असे उद्गार  सुप्रसिद्ध वक्ते, इतिहासाचे अभ्यासक  प्रा.नितीन बानुगडे पाटील यांनी काढले.
स्व.अरुण गोडबोले यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सातारा येथील  गोडबोले कुटुंबिय,अश्वमेध ग्रंथालय आणि सोमण स्मारक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या समर्थ सदन येथील सोहळ्यात  पत्रकार व साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बानुगडे पाटील बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेशबुवा रामदासी उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त करणारे जेष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र माने यांच्यासह याप्रसंगी व्यासपीठावर गोडबोले परिवाराचे  डॉ.अच्युत गोडबोले ,अशोक गोडबोले, उदयन गोडबोले , अश्वमेध ग्रंथालयाचे रवींद्र  झुटींग.यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. अच्युत गोडबोले म्हणाले की, मागील वर्षी अरुणराव व आमची बहीण शारदा शिंत्रे यांचे  निधन झाले. 14 ऑक्टोबर हा अरुणरावांचा स्मृतिदिन साजरा करत असताना  विविध क्षेत्रात काम करताना अरुण रावांनी  माणसे जोडण्याची कामे  केली. मार्गदर्शन करणे हे त्यांचे खास लक्षण म्हणावे लागेल. बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून आणि कुटुंब प्रमुख म्हणून अतिशय मोठे आणि चांगली जबाबदारी त्यांनी राबविली .गोडबोले ट्रस्टचे काम सुरू करून ते वृद्धिंगत केले. सातारा भूषण पुरस्कार ,गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देत यात फंडाचे रक्कमही वाढवली .पुस्तक तसेच सिनेमा यांच्या द्वारे कार्यनिर्मिती करताना राज्य शासनाचे पुरस्कारही मिळविले .आमची बहीण उषा म्हणजेच स्व.शारदा
शिंत्रे   या मराठीत  त्याकाळी कन्या शाळेतून एसएससी परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आल्या होत्या. त्यांनी एम. ए. पदवी संपादन करून मराठीतच पत्रकारितेत विशेष ध्यास घेत, पुण्यात कार्यरत राहिल्या. रोहिणी, संध्या यासारख्या मासिकात काम करत पुणे जिल्हा पत्रकार संघाची ही अध्यक्षा म्हणून जबाबदारी बराच काळ सांभाळली. मराठीचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी   परदेशातील नागरिकांना सुद्धा दृकश्राव्य माध्यमातून मराठी शिकवण्याचे मोठे योगदान दिले .आज या दोघांचा स्मृतिदिन साजरा करताना साहित्य ,पत्रकार क्षेत्रातील लोकांना गौरवण्यासाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे. तसेच अश्वमेध ग्रंथालयाच्या रवींद्र  झुटींग  यांच्या संकल्पनेतून सभागृहाला स्व.अरुणरावांचे नाव देण्यात आले आहे.
 याप्रसंगी  योगेशबुवा रामदासी   यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे यांना दहा हजार रुपये तसेच सन्मानपत्र, पुष्पगुच्छ असा पुरस्कार वितरित करण्यात आला.  यावेळी सौ.श्रद्धा कात्रे यांची उपस्थिती होती.  तर नितीन बानुगडे पाटील यांचे हस्ते ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र माने यांचाही  दहा हजार रुपये तसेच सन्मानपत्र, पुष्पगुच्छ  पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सौ. रोहिणी माने  यांची उपस्थिती होती.     .
सत्काराला उत्तर देताना श्रीकांत कात्रे  म्हणाले   की,सातारचे सार्वजनिक जीवन बदलण्याचे काम अरुण काकांनी केले.  मी  गेले 36 वर्षे एकत्रित त्यांच्यासोबत काम केले. पत्रकारिता, राजकारण, समाजकारण यामध्ये ते नेहमीच मार्गदर्शन करत. एक वर्ष त्यांना जाऊन काळ लोटला तरी खरंच वाटत नाही की ते आपल्यात नाहीत. पुस्तकाच्या कामातही संधी देण्याचे दातृत्व अरुणरावांनी मला दिले .अनेकांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करत चांगले काम करण्याची दिशा त्यांनी दिली. त्यांच्या विचारांच्या वाटचालीलाच पुढे नेत आपण जगण्याची दिशा ठरवावी.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. राजेंद्र माने म्हणाले की, या नावाचा पुरस्कार वेगळा आनंद देणारा आहे. अरुण काकांचा 30 वर्षे मला सहवास लाभला माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत विविध प्रकारचे संस्कार त्यांचे कडून माझे वर झाले.  माणसे कशी जोडावी व त्यांचा वापर योग्य त्यावेळी कसा करावा, ऋणानुबंध कसे वाढवावे हाच संस्कार त्यांनी आमच्यावर केला. अनेक दिग्गजांना साताऱ्यात आल्यावर त्यांचे सहवासात आणण्याचे काम काकांनी माझ्यासाठी केले, हे भाग्य आम्हाला लाभले .असे हे   बहुआयामी  व्यक्तिमत्व खरोखरच सर्वांचे लाडके असे होते.
 योगेश बुवा रामदासी म्हणाले 'एखाद्या नावे दिला जाणारा पुरस्कार ही प्रेरणा आहे.समर्थ सेवा मंडळाच्या  कामात  गोडबोले कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे, स्वर्गीय भाऊकाका व अरुणकाका या दोघांनी घालून दिलेली शिस्तही वाखाणण्याजोगी होती. मारुतीबुवा   रामदासी यांचे कडूनही याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन होत असे .जो वेळ सांभाळतो तो आयुष्यात खूप काही शिकतो, आज सभागृहाचे नामकरण करण्यात आले याचा खूप आनंद वाटतो .नामकरण हा केलेल्या कार्याचा गौरव आणि स्मरण करून प्रेरणा देणारे आहे ,आणि कार्य हे केलेच पाहिजे ही समर्थांची इच्छा होती .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रद्युम्न गोडबोले यांनी केले, तर आभार प्रदर्शन अश्वमेध ग्रंथालयाचे रवींद्र  झुटींग यांनी केले. कार्यक्रमास श्रीमती अनुपमा गोडबोले, डाॅ. सौ  अनुराधा गोडबोले,  सौ .संजीवनी गोडबोले,  डाॅ. सौ. स्नेहा गोडबोले, डॉ .गौरी ताम्हणकर, श्रीराम नानल,  डाॅ.  सुहास जोशी ,अंजली कुलकर्णी, डॉ .ज्योत्सना कोल्हटकर, डाॅ.अजय साठे, शरद महाजनी, सतीश गिझरे, डॉ .श्याम बडवे ,श्रीकांत शेटे, डॉ. धनंजय बोधे, गजाननराव बोबडे, डॉ. मोहन सुखटणकर गोपाळ खजुरे. रमण वेलणकर, ज्येष्ठ विचारवंत व प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, बाळासाहेब कुलकर्णी, सदाशिव क्षीरसागर, अनिल काटदरे, प्रकाश बडेकर ,यशवंत घोरपडे, मुकुंद फडके, अविनाश लेवे ,गौतम भोसले, प्रकाश घाडगे,  सौ.  वासंती घाडगे, प्रा.श्रीधर साळुंखे यांचेसह  गोडबोले परिवारातील सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी कृषी विभागाची तयारी; पंचनामे करण्याचे काम प्रगतीपथावर, रब्बी हंगामामध्ये २१० प्रशिक्षण व ४० शेतीशाळा राबवणार

संबंधित बातम्या