कोरेगाव व खटाव तालुक्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत शेतकऱ्यांना जलव्यवस्थापन व पीक पद्धतीबाबत मार्गदर्शन

by Team Satara Today | published on : 14 October 2026


सातारा : सेवा संकल्प अभियानांतर्गत प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी जलसंपदा विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पीक पद्धतीत बदल, कृषी उत्पादकता वाढ आणि पाण्याचे योग्य नियोजन याबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. भाडळे (ता. कोरेगाव), रहिमतपूर (ता. कोरेगाव) आणि निमसोड (शितोलनगर, ता. खटाव) येथे आयोजित या उपक्रमाला शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमांतर्गत बैठका, कार्यशाळा व मार्गदर्शन सत्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याचा काटकसरीने वापर, आधुनिक सिंचन पद्धती आणि सुधारित पीक नियोजन याविषयी माहिती देण्यात आली. शेतीसाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचा कार्यक्षम वापर करून उत्पादनात वाढ कशी साधता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचा वापर करावा, पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये आवश्यकतेनुसार पाणी द्यावे, जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी आच्छादन पद्धतीचा अवलंब करावा, तसेच उपलब्ध पाण्याच्या प्रमाणानुसार पीक क्षेत्र निश्चित करावे, असे आवाहन करण्यात आले. पीक निवड करताना जमिनीचा प्रकार, पावसाचे प्रमाण, स्थानिक हवामान आणि पाण्याची उपलब्धता या बाबी विचारात घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. कमी पाण्यात येणारी पिके आणि चारा पिकांचे योग्य नियोजन केल्यास पाण्याची बचत होण्याबरोबरच शेती अधिक फायदेशीर होण्यास मदत होऊ शकते, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये पाणी बचत, जलव्यवस्थापन आणि सुधारित पीक पद्धतींबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली. उपलब्ध जलसंपत्तीचा योग्य वापर करून कृषी उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने सेवा संकल्प अभियानातील हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी साताऱ्यात मतदान पथकांचे प्रशिक्षण; जिल्ह्यातील १३७ मतदान केंद्रांवरील केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग
पुढील बातमी
दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी कृषी विभागाची तयारी; पंचनामे करण्याचे काम प्रगतीपथावर, रब्बी हंगामामध्ये २१० प्रशिक्षण व ४० शेतीशाळा राबवणार

संबंधित बातम्या