चार वर्षांपासून गांजा तस्करीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी वाईतून जेरबंद; म्हसवड पोलिसांची कारवाई

by Team Satara Today | published on : 14 October 2026


सातारा : गांजा तस्करीच्या गुन्ह्यात गेल्या चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला म्हसवड पोलिसांनी वाई येथून जेरबंद केले. अजहर जब्बार इनामदार (वय ३५, रा. फुलेनगर, ता. वाई, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे गांजा तस्करीच्या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी चरण लालासो शिंदे (वय ३०, रा. पाणवण, ता. माण, जि. सातारा) यांच्या मालकीच्या उसाच्या शेतात विक्रीच्या उद्देशाने आणून ठेवलेला सुमारे ६० किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा सदृश अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला होता. त्याची किंमत १५ लाख दोन हजार ५०० रुपये होती. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३/२०२३ अन्वये अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याच्या तपासादरम्यान चरण शिंदे याने अमोल करे आणि अजहर इनामदार या दोघांनी हा मुद्देमाल आणून दिल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता.
गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अजहर इनामदार हा वाई येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि. संदीप पोमण करीत आहेत.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि दहिवडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पोमण, सहायक पोलीस निरीक्षक अमित शिंदे तसेच अंमलदार अमर नारनवर, अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे आणि धीरज कवडे यांनी ही कारवाई केली. या कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे अभिनंदन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दूध वाहतुकीसाठी प्लास्टिक कॅन ऐवजी स्टेनलेस स्टीलच्या कॅनचाच वापर करा; अन्न व औषध प्रशासनाचे जिल्ह्यातील दुग्ध व्यावसायिक, हॉटेल चालकांना विशेष आवाहन
पुढील बातमी
शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्यास तो माझ्यासाठी आशीर्वादच; एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत सानप यांची सकारात्मक प्रतिक्रिया

संबंधित बातम्या