सातारा : यात्रा-जत्रा, बसस्थानके आणि गर्दीच्या ठिकाणी चोरी व जबरी चोरीचे गुन्हे केल्याच्या आरोपांप्रकरणी कराडमधील पती-पत्नीच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. श्रावण राजेश कांबळे (वय ३३) आणि पूनम श्रावण कांबळे (वय २७, दोघेही रा. मलकापूर, ता. कराड) अशी संबंधित आरोपींची नावे आहेत. संघटितपणे गुन्हे करून आर्थिक फायदा मिळविण्याच्या आरोपांची दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली.
कराड शहर आणि परिसरातील गर्दीच्या ठिकाणी चोरी व जबरी चोरीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी संबंधित टोळीच्या गुन्हेगारी कारवायांची माहिती संकलित केली. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७२१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याचे गांभीर्य आणि उपलब्ध कागदपत्रांचा विचार करून कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केला. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यामार्फत हा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर संबंधित गुन्ह्यात मोक्क्याची कलमे वाढविण्यास परवानगी देण्यात आली.
मोक्का कारवाईनंतर या गुन्ह्याचा पुढील तपास कराड विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात संघटित गुन्हेगारीला आळा घालणे, सराईत गुन्हेगारांकडून निर्माण होणारी दहशत रोखणे आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा आणि कराड शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
गर्दीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्या कराडमधील पती-पत्नीच्या टोळीवर मोक्का; गुन्ह्यांची गंभीर दखल; विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून कारवाईला मंजुरी
by Team Satara Today | published on : 14 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा