सातारा : साहित्याला भाषेच्या सीमा नसतात. विविध भाषांतील साहित्य मानवी भावना, संवेदना आणि विचारांना जोडून सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचा भक्कम सेतू निर्माण करते, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी केले.
हिंदी अनुसंधान प्रसार केंद्र (अहिल्यानगर) आणि 'गवीसिद्ध प्रतिष्ठान (कोप्पल) यांच्या संयुक्त विद्यमाने कोप्पल (कर्नाटक) येथे आयोजित 'महाबली पोएट्री फेस्टिव्हल २०२६' या दोनदिवसीय आंतरराज्य काव्यमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
भाषांतरामुळे एका भाषेतील साहित्य दुसऱ्या भाषेतील वाचकांपर्यंत पोहोचते. त्यातून विविध संस्कृती, विचारविश्व आणि जीवनशैली यांची ओळख होऊन परस्परांविषयी आदर व आत्मीयता वाढते. भाषांतर म्हणजे केवळ शब्दांचे रूपांतर नसून एका मनातील संवेदना दुसऱ्या हृदयापर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया आहे, असेही डॉ. चेणगे यांनी सांगितले.
या महोत्सवाला लोकसाहित्याच्या अभ्यासक व लेखिका प्रतिमा इंगोले आणि कर्नाटकातील प्रसिद्ध लेखक अल्लमप्रभू बेट्टाडुर उपस्थित होते. या संमेलनात भुवनेश्वर, हैदराबाद, बंगळुरू तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कवी-लेखकांनी सहभाग घेतला. यावेळी डॉ. संजय बोरुडे, डॉ. बाळासाहेब लबडे, मनोरंजन साहू आणि मोहन राठोड यांच्या अनुवादित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
महोत्सवाच्या आयोजनासाठी डॉ. संजय बोरुडे, रचना, सुजाता भोजणे, महेश बेल्लारी, राजू बेल्लारी आणि आनंद गोडाबाल यांनी परिश्रम घेतले. कवयित्री रचना यांनी आभार मानले.
साहित्याच्या धाग्यांनी जोडली जातात मने : डॉ. बसवेश्वर चेणगे
by Team Satara Today | published on : 14 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा