सातारा : ऊस उत्पादक शेतकर्यांच्या घामाला योग्य दाम मिळणार नसेल, तर साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा किसान कॉंग्रेसने घेतला आहे. आगामी गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर जाहीर करा; अन्यथा जिल्ह्यातील एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही, असा थेट इशारा किसान कॉंग्रेसचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष वसीम इनामदार यांनी दिला आहे. याप्रश्नी त्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कारखानदारांसह प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची तयारी सुरू झाली असताना ऊस उत्पादकांच्या मोबदल्याचा प्रश्न मात्र अनुत्तरित असल्याचा आरोप इनामदार यांनी केला. कारखाने सुरू करण्यासाठी हालचाली वेगाने होत आहेत; मग शेतकर्यांना मिळणार्या दराबाबत निर्णय घेण्यास विलंब का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ऊसदर आणि रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) स्पष्टता नसताना गाळप सुरू करण्याची घाई कशासाठी, असा प्रश्नही त्यांनी विचारला. कोवळ्या उसाचे गाळप करून घेण्यापूर्वी कारखानदारांनी दर जाहीर करावा, अशी मागणी करत इनामदार यांनी शेतकर्यांना एकजुटीचे आवाहन केले.
दर निश्चित होईपर्यंत ऊसतोड करू नका आणि कारखान्यांना ऊसपुरवठा करू नका, असे त्यांनी म्हटले आहे. शेतकरी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले की त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल होतात; मात्र नियमांचे उल्लंघन करणार्या कारखानदारांवर कारवाई का होत नाही, असा सवालही त्यांनी केला.
ऊस नियंत्रण आदेश 1966 आणि आवश्यक वस्तू कायदा 1955 यांची प्रभावी अंमलबजावणी करून नियमभंग करणार्या कारखान्यांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक तातडीने बोलवून दराचा प्रश्न मार्गी लावावा, अशीही मागणी आहे. उसाच्या दरावरून शेतकरी संघटना आक्रमक झाल्याने आगामी गाळप हंगामापूर्वी जिल्ह्यात संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.
पाच हजारांचा दर जाहीर करा, मगच गाळप सुरू करा! वसीम इनामदारांचा कारखानदारांना निर्वाणीचा इशारा; दराशिवाय ऊस देऊ नका, शेतकर्यांना आवाहन
by Team Satara Today | published on : 13 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा