मुंबई : कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणारी सक्षम गुंतवणूक परिसंस्था महाराष्ट्रात उपलब्ध असून, यूकेमधील संस्था आणि उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील ताज पॅलेस येथे आयोजित महाराष्ट्र-यूके भागीदारी शुभारंभ कार्यक्रमात केले.
महाराष्ट्र आणि यूकेदरम्यान विविध क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करारांचे आदानप्रदान करण्यात आले. या भागीदारीमुळे महाराष्ट्रातील उत्पादक, अन्नप्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान कंपन्या आणि लघुउद्योजकांना ब्रिटनमधील बाजारपेठांमध्ये विस्ताराच्या संधी उपलब्ध होतील. ही भागीदारी प्रत्यक्ष गुंतवणूक, उद्योगवाढ आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगाने मार्गी लावण्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र व्यासपीठाच्या माध्यमातून संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यात येणार आहे. मुंबईचे आंतरराष्ट्रीय वित्त व व्यापार क्षेत्रातील महत्त्व, पुण्याची अभियांत्रिकी, वाहन उद्योग व माहिती तंत्रज्ञानातील क्षमता, कुशल मनुष्यबळ आणि सक्षम औद्योगिक परिसंस्था ही महाराष्ट्राची प्रमुख बलस्थाने आहेत. तसेच शिक्षण, आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वच्छ ऊर्जा आणि तंत्रज्ञान संशोधन क्षेत्रांत यूकेसोबत सहकार्य वाढविण्याची मोठी संधी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
दरम्यान, यूकेचे राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांनीही महाराष्ट्रात प्रत्यक्ष व्यावसायिक परिणाम साधण्यावर भर दिला. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबळगण, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे यांच्यासह दोन्ही देशांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यूकेमधील संस्था, उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, महाराष्ट्र-यूके भागीदारीचा मुंबईत शुभारंभ
by Team Satara Today | published on : 13 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा