पुणे : आता वेळ कमी आहे, त्यामुळे कोणत्या उमेदवाराची काय लायकी आणि क्षमता आहे हे मतदारांसमोर स्पष्ट व्हायला हवे. शनिवार वाड्यासमोर चार खुर्च्या आणि दोन माईक लावा; तिकडचे दोन आणि इकडचे दोन उमेदवार बसवा आणि टीव्ही कॅमेऱ्यांसमोर थेट खुली चर्चा (डिबेट) होऊ द्या," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी जयंत पाटील यांनी भाजप आणि सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांना थेट आव्हान दिले आहे.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते.
"हा कोणताही विनोद नाही, तिथे बोर्ड लावा की चर्चासत्रासाठी सर्व उमेदवारांनी हजर राहावे. भाजप पुरस्कृत दोन उमेदवार आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार आमनेसामने बसवा. जास्त माणसे आणण्याची गरज नाही, मीडियाचे मित्र तिथे येतील. प्रा. जयंत आसगावकर यांनी गेल्या सहा वर्षांत विधान परिषदेत शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले आहेत आणि काम केले आहे. समोरासमोर डिबेट झाली तर आमचे उमेदवार विरोधकांचे सर्व मुद्दे खोडून काढतील आणि जनतेलाही कोण सरस आहे ते स्पष्ट समजेल," असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
भाजपला स्वतःच्याच मित्रपक्षांवर अविश्वास
भाजपने जाहीर केलेल्या मतदारसंघातील निरीक्षकांच्या यादीवरून जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार राजकीय निशाणा साधला. भाजपने निरीक्षकांची यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र, हे निरीक्षक नेमके कुठे नेमले आहेत? तर ज्या ठिकाणी अजित पवार गटाचे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार आहेत, तिथेच हे निरीक्षक बसवले आहेत. म्हणजेच भाजपला आपल्याच मित्रपक्षांच्या आमदारांवर प्रचंड शंका आहे. हे आमदार आपल्याला मदत करणार नाहीत याची भाजपला खात्री पटल्यानेच त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी ही खबरदारी घेतली गेली आहे. यावरून सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे स्पष्ट दिसते असा टोला त्यांनी लगावला.
आयात उमेदवारांमुळे विरोधकांमध्ये गोंधळ
भाजपकडे स्वतःचे निष्ठावंत उमेदवार नसल्याची टीका करताना ते म्हणाले, भाजपने दिलेले उमेदवार मूळ पक्षातील नाहीत. आमच्याकडून जे तिकिटासाठी तिकडे गेले, त्यांना आधी शब्द दिला; नंतर विरोध असल्याचे सांगून पक्षातला निष्ठावंत शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटी अचानक उमेदवारी जाहीर करावी लागल्याने समोरच्या गोटात प्रचंड गांगरून गेल्याची स्थिती आहे.
सुशिक्षित मतदारांचा कल सत्ताधाऱ्यांविरोधात
देशातील आणि राज्यातील राजकीय वातावरण बदलले असून, याचा अचूक अंदाज पदवीधर, शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना आधी येतो. सरकारी कर्मचारी आणि सुशिक्षित वर्ग आज सरकारच्या धोरणांवर नाराज आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिक्षक आणि पदवीधर मतदार महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून सरकारच्या विरोधात जनमत असल्याचे दाखवून देतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
शनिवार वाड्यासमोर ४ खुर्च्या ठेवा, भाजपच्या उमेदवारांसोबत खुली डिबेट होऊ द्या; जयंत पाटलांचे उघड आव्हान
by Team Satara Today | published on : 13 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा