ज्येष्ठ अभिनेत्री अन् लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांचं निधन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळा

by Team Satara Today | published on : 12 October 2026


पुणे : मराठी मनोरंजनविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी कलावंत मधु कांबीकर यांचं सोमवारी (दि. १२) निधन झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या. पुण्यात प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या दमदार अभिनयाने आणि बहारदार लावणीने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या मधु कांबीकर यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि लोककला क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मधु कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना लोककलेची आवड होती. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कलाप्रवासाला सुरुवात केली. पुढे लावणी, वगनाट्य आणि व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 'गाढवाचं लग्न', 'विच्छा माझी पुरी करा' आणि 'भानगडीशिवाय पुढारी नाही' यांसारख्या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
रंगभूमीबरोबरच मधु कांबीकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही मोठं योगदान दिलं. 'शापित', 'एक होता विदूषक', 'झपाटलेला', 'बिनकामाचा नवरा', 'मुक्ता', ‘चल रे लक्ष्या मुंबईला’ आणि ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या. ‘शापित’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल २०१८ मध्ये त्यांना ‘झी चित्र गौरव जीवनगौरव पुरस्कार’ही प्रदान करण्यात आला होता.
२०१६ पासून आजाराशी झुंज
नोव्हेंबर २०१६ मध्ये मुंबईतील यशवंत नाट्यमंदिरात लावणीच्या कार्यक्रमानंतर मधु कांबीकर यांना पक्षाघाताचा (पॅरालिसिस) झटका आला होता. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला. उपचार सुरू असतानाही त्यांना पूर्वीप्रमाणे अभिनय आणि नृत्यक्षेत्रात सक्रिय राहता आलं नाही. अखेर प्रदीर्घ आजारानंतर सोमवारी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वाने एक हरहुन्नरी अभिनेत्री आणि महाराष्ट्राच्या लोककलेचा समृद्ध वारसा जपणारी कलावंत गमावली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात; राहुल गांधीचा गौप्यस्फोट; राजीनामा द्या आणि रस्ता साफ करण्याचा दिला सल्ला
पुढील बातमी
कॉकरोच जनता पार्टीने विरोधकांच्या सुप्रीम मार्चला दिला पाठिंबा; इंडिया गेटपासून करणार कूच

संबंधित बातम्या