कराड : मालखेड (ता. कराड) फाटा येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत सहा वर्षांच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला असून तिची आई आणि चुलता गंभीर जखमी झाले आहेत. वेदश्री सुजित कुंभार (वय ६, रा. बेलवडे बुद्रुक) असे अपघातात ठार झालेल्या बालिकेचे नाव आहे.
सुजित कुंभार यांच्या पत्नी सायली कुंभार (वय २८) आणि भाऊ अजित माणिक कुंभार (वय २५) हे दोघे दि. ११ रोजी कामाच्या निमित्ताने वेदश्रीला सोबत घेऊन दुचाकीवरून (क्रमांक एमएच ५० एबी ०१५१) बाहेरगावी गेले होते. काम आटोपून बेलवडे बुद्रुक येथे परत येत असताना दुपारी तीनच्या सुमारास मालखेड फाट्यावर एका अनोळखी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वेदश्री जागीच ठार झाली, तर सायली कुंभार व अजित कुंभार दोघेही गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच दस्तगीर आगा यांनी रुग्णवाहिकेला कळवले. त्यानंतर प्रफुल्ल बाबर यांनी तातडीने रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवून दिली. अपघात विभागाचे पोलीस प्रशांत जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. स्थानिक नागरिक अक्षय कदम, राहुल कदम व आगा यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी तातडीने कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मालखेड फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सहा वर्षांची बालिका ठार; आईसह चुलता गंभीर जखमी
by Team Satara Today | published on : 12 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा