पुणे : एमपीएससीच्या अध्यक्षांना हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आमदार रोहित पवार यांनी सरकारला आज संध्याकाळपर्यंत ठोस निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी आणि आंदोलनाबाबत तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा उद्या विद्यार्थी वेगळा निर्णय घेऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
रोहित पवार यांनी एमपीएससीच्या अध्यक्षांना पदावरून हटवण्याची मागणी पुन्हा अधोरेखित केली. आयोगाचे शुद्धीकरण करायचे असेल, तर अध्यक्षांना हटवणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची हीच प्रमुख मागणी असून, त्यावर सरकारने ठोस भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले.
दरम्यान, आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ‘अर्बन नक्षल’ संबोधणे आणि त्यांनी पैसे घेतल्याचे आरोप करणे, यावरूनही रोहित पवार यांनी टीका केली. स्वतःच्या हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे संबोधणे म्हणजे गरीब आणि शेतकरी कुटुंबांतील तरुणांची थट्टा करण्यासारखे असल्याचे त्यांनी म्हटले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज असल्याचे सांगत, सरकारने आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांना निर्णयाबाबत निरोप द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
आज संध्याकाळी आंदोलनाचे पुढील स्वरूप आणि उद्यापासून कोणत्या पद्धतीने आंदोलन केले जाणार, याबाबत माहिती देण्यात येईल, असे रोहित पवार यांनी सांगितले. सरकारने वेळेत निर्णय घेतला नाही, तर आंदोलनकर्ते पुढील भूमिका ठरवतील, असा इशारा त्यांनी दिला. एमपीएससीच्या अध्यक्षांना हटवण्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम असून, सरकार या प्रश्नावर काय भूमिका घेते आणि आंदोलनाची पुढील दिशा काय ठरते, याकडे आता लक्ष लागले आहे.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना भेटा, आंदोलनाबाबत ठोस निर्णय घ्या; रोहित पवार आक्रमक, अध्यक्षांना हटवण्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम
by Team Satara Today | published on : 11 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा