औंधच्या शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची माहिती

by Team Satara Today | published on : 11 October 2026


औंध : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंध येथील ग्रामनिवासिनी व मूळपीठ निवासिनी श्री यमाईदेवी तसेच राजवाड्यातील श्री कराडदेवी यांच्या नवरात्रोत्सवानिमित्त दि. ११ ते २१ ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाची देवस्थानच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली.
औंध येथील ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवी मंदिर, राजवाडा परिसर तसेच मूळपीठ डोंगरावरील मंदिर परिसरात स्वच्छता आणि सजावटीची कामे सुरू आहेत. डोंगरावरील पायऱ्यांची स्वच्छता करण्यात येत असून, मंदिर परिसरातही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रविवार दि. ११ ऑक्टोबर रोजी राजवाड्यातील अजिंठा हॉलमध्ये श्री कराडदेवीची मकरात प्रतिष्ठापना गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी चारुशीलाराजे पंतप्रतिनिधी, हर्षिताराजे पंतप्रतिनिधी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुण्याहवाचन, मंत्रपुष्पांजली, महाआरती आणि महानैवेद्य असे धार्मिक विधी होतील. गणेशशास्त्री इंगळे व पौरोहित्य वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याहवाचन होणार आहे.
सोमवार दि. १२ ते रविवार दि. १८ ऑक्टोबरदरम्यान दररोज सकाळी व रात्री महानैवेद्य, महाआरती आणि मंत्रपुष्पांजली आदी धार्मिक कार्यक्रम होतील. या कालावधीत दररोज सायंकाळी चार वाजता श्री यमाईदेवी मंदिरात बाल कीर्तनकार ह.भ.प. साई वैभव हरिदास यांचे, तर रात्री नऊ वाजता गजाननबुवा कुरोलीकर यांचे कीर्तन होणार आहे. सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी अष्टमी उत्सवानिमित्त मूळपीठ डोंगरावर दुपारी चार वाजता यात्रा भरणार आहे. यावेळी कुष्मांडपूजेसह विविध धार्मिक विधी होतील. हजारो भाविक या यात्रेस उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. श्री यमाईदेवीची पालखीतून मिरवणूक, पूजा व आरती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते आणि राजघराण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. रात्री हरिजागराचा कार्यक्रमही होईल.
मंगळवार दि. २० ऑक्टोबर रोजी महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली, देवीच्या पाट्यांचे पूजन, ओटीपूजन, मूळपीठ डोंगरावरील श्री यमाईदेवीचे ओटीभरण, घटोत्थापना तसेच कुमारिका पूजन असे धार्मिक विधी होतील. दुपारी एक ते चार या वेळेत राजवाड्यात ग्रामस्थांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता प्रथेप्रमाणे औंध गावातून दसऱ्याची शाही मिरवणूक निघणार आहे. श्रींची पालखीतून मिरवणूक काढल्यानंतर गावाच्या सीमेवर आपट्याची पाने लुटण्याचा पारंपरिक कार्यक्रम होईल. तसेच गोळीबार करून डबे फोडण्याची प्रथाही पार पाडली जाईल. रात्री श्री कराडदेवीच्या सभामंडपात गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या अधिपत्याखाली दरबार भरवण्यात येणार असून, गवई गान आणि पानसुपारी वाटपाचा कार्यक्रम होईल. बुधवार दि. २१ ऑक्टोबर रोजी लळिताच्या कार्यक्रमाने नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वडूजमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; दोन दुकाने, दोन घरे फोडली, नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
पुढील बातमी
जिल्हा बँकेत पक्षाचे अस्तित्व दाखवणार : शशिकांत शिंदे, आम्‍हाला कोणीही विचारात घेत नव्‍हते, यासाठी मी दोन ठिकाणांवरून उमेदवारी अर्ज

संबंधित बातम्या