अल्पसंख्याकांच्या विकास, हक्कांसाठी एकजुटीने यशस्वी होऊच - झाकीर शिकलगार, सातारा जिल्हा अल्पसंख्याक विकास परिषद उत्साहात

by Team Satara Today | published on : 10 October 2026


सातारा : “सत्ता कोणाची आहे आणि  सत्ताधारी कोण आहेत? यापेक्षा अल्पसंख्याकांच्या विकासासाठी आणि हक्कांसाठी आपण एकजुटीने प्रयत्न करून आपण यशस्वी होऊच,” असा ठाम निर्धार महा मायनॉरिटी NGO फोरमचे संस्थापक अध्यक्ष झाकीर शिकलगार यांनी व्यक्त केला.
महा मायनॉरिटी NGO फोरम (MMNF) आयोजित सातारा जिल्हा अल्पसंख्याक विकास परिषद गुरुवार पेठ येथील आदमभाई बागवान हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली. यावेळी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास, सुरक्षा आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांवर चर्चा करण्यात आली.
परिषदेत आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी MRTI ची नोंदणी पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी २०० कोटींचा निधी उपलब्ध करणे, जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी पदावर स्वतंत्र अधिकारी नियुक्त करणे आणि अल्पसंख्याक विकास विभागाचा १,००० कोटींचा निधी मार्च २०२७ पूर्वी १०० टक्के खर्च करण्यासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करणे, या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.
MMNF चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सादिकभाई शेख यांनी अल्पसंख्याकांसाठी १,००० कोटींपेक्षा अधिक निधीची तरतूद, स्वतंत्र अल्पसंख्याक आयुक्तालय, जिल्हास्तरीय अल्पसंख्याक अधिकारी, जिल्हास्तरीय स्वतंत्र वक्फ कार्यालये आणि MARTI ची मंजुरी या सकारात्मक घडामोडी असल्याचे सांगितले. विविध NGO ना सोबत घेऊन MMNF ने संघटितपणे केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे नमूद करून त्यांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष झाकीर शिकलगार, प्रदेशाध्यक्ष सादिकभाई शेख, युवा विभागाचे राज्याध्यक्ष इरफान शेख, गुलाब शेख, जहीर मुजावर आणि ॲड. हसन मुलाणी उपस्थित होते. इंथेखाब बागवान, अझहरुद्दीन मणेर, अब्दुल शकूर शाह, मुझफ्फर सय्यद, हाजी मलंग नदाफ,शाहीर मोन्या बागवान, आरिफ खान आणि आफताब शेख यांच्यासह इतरांनी नियोजन केले. ॲड. झीनत मुल्ला व अल्फाज मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले, तर खुशी शेख यांनी आभार मानले.
परिषदेला सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विविध संस्थांचे मान्यवर उपस्थित होते. “एकता, विकास आणि हक्क-अधिकार” या संदेशातून अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांसाठी संघटित लढा देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा बसस्थानकातील सुरक्षारक्षकाच्या केबिनमध्ये वृद्धाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

संबंधित बातम्या