सातारा : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवार (दि. ९) हा अखेरचा दिवस होता. प्रा. सचिन नवनाथ सानप यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचे स्पष्ट केले.
विभागीय आयुक्त कार्यालय येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, शिक्षक-प्राध्यापक संघटनांच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, ही लढाई केवळ निवडणुकीची नसून शिक्षकांच्या सन्मानाची, स्वाभिमानाची आणि हक्कांची आहे.
"शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा" ही भूमिका अधोरेखित करताना सानप म्हणाले, "शिक्षक-प्राध्यापकांचा विश्वास आणि पाठबळ हीच माझी खरी ताकद आहे. त्यांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत प्रभावी आवाज मिळावा, यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे. येणाऱ्या आव्हानाला सामोरे जाण्याची माझी पूर्ण तयारी आहे."
संचमान्यता, पटपडताळणी, कार्यभार, जुनी पेन्शन योजना, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे प्रश्न आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध सेवाविषयक समस्या यांची सखोल जाण असणारा शिक्षकच शिक्षकांचा खरा प्रतिनिधी ठरू शकतो असे सानप यांनी व्यक्त केले.
प्रा. सचिन सानप यांनी पुणे विभागातील सर्व शिक्षकांना एकत्र येण्याचे आवाहन करत, या निवडणुकीत प्रथम पसंतीचे मतदान करण्याची विनंती केली.
शिक्षक-प्राध्यापक संघटनांच्या पाठिंब्यावर प्रा. सचिन सानप यांची उमेदवारी कायम; आव्हानाला सामोरे जाण्याची माझी पूर्ण तयारी
by Team Satara Today | published on : 10 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा