मंचर : 'राज्यातील भूमिहीन पारधी व फासेपारधी समाजातील पात्र कुटुंबांनी गायरान किंवा वनक्षेत्रातील जमिनींवर अतिक्रमण करून उपजीविकेची साधने उभी केली आहेत. अशा कुटुंबांच्या जमिनी त्यांच्या नावे करण्याबाबत महसूल विभागाच्या स्तरावर कार्यवाही सुरू होण्याची अपेक्षा असून, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित समाजबांधवांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.' अशी माहिती मंचर (ता. आंबेगाव) येथील सावित्रीबाई फुले आदिवासी आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष मंगेश भोसले यांनी दिली.
पारधी व फासेपारधी समाजातील भूमिहीन कुटुंबांच्या जमिनींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी महासंघासह विविध सामाजिक संस्था सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. याच मागणीसाठी विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह समाजाच्या प्रतिनिधींनी मुंबई येथे मंत्रालयात बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी पारधी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके, आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे अध्यक्ष विनोद चव्हाण, रमेश शिंदे, लखन भोसले, निकिता भोसले, केशव पवार, देविदास काळे (सोलापूर), सुदर्शन शिंदे (बुलढाणा), संगीता चव्हाण (वाशिम), आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा
पारधी समाजातील कुटुंबांच्या जमिनींच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित समाजबांधवांना वेळ देऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असे निर्देश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रशासकीय स्तरावर पुढील कार्यवाहीला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, गायरान किंवा वनक्षेत्रातील जमिनींचे हक्क संबंधित कायदे, नियम आणि पात्रतेच्या निकषांनुसारच निश्चित होणार असल्याने प्रत्यक्ष सातबारा नोंदींबाबत शासनाच्या पुढील निर्णयाकडे समाजाचे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्ह्यातील पारधी व फासेपारधी समाजातील कुटुंबांची संख्या २हजार २८५ आहे. त्यांच्या जमिनींचा प्रश्न महत्त्वाचा आहे. या कुटुंबांना जमिनींचे हक्क मिळाल्यास त्यांच्या उपजीविकेला स्थैर्य मिळण्यास मदत होईल. त्यामुळे जिल्हाधिकारी पुणे कार्यालयाने या प्रश्नाकडे लक्ष देऊन पात्र कुटुंबांच्या प्रकरणांबाबत नियमानुसार कार्यवाही करावी.'
- मंगेश भोसले, संस्थापक अध्यक्ष सावित्रीबाई फुले आदिवासी आश्रमशाळा मंचर (ता. आंबेगाव)
राज्यातील पारधी समाजाच्या अतिक्रमित जमिनींचे सातबारे करण्यासाठी कार्यवाही होणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश दिले
by Team Satara Today | published on : 09 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा