"दहशतीमुळे आंदोलन थांबणार नाही, आम्ही जंतरमंतर येऊच, सरकार युद्धाची तयारी करत आहे का?"; सीजेपीचा सवाल

by Team Satara Today | published on : 09 October 2026


दिल्ली : जंतरमंतरवर होणाऱ्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. सरकार आणि पोलीस यंत्रणेने दिल्लीतील तब्बल ५७ मेट्रो स्थानके बंद केली आहेत. तर अनेक लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. हजारो सुरक्षा कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले असून ॲप-आधारित कॅब्सवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे सरकार युद्धाची तयारी करत आहे का? सरकार आपल्याच नागरिकांविरोधात युद्ध पुकारत आहे का? असा सवाल सीजेपीच्या विद्यार्थी नेत्यांनी केला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनासाठी दिल्लीला छावणीचे स्वरुप आले आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. रेल्वे, मेट्रो सेवा, रेस्टॉरंटसबद्दलही निर्णय घेतले गेले आहे.  सीजेपीचा नेता अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी प्रशासन तरुणांना आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा कर्मचारी आंदोलनाची तयारी करतानाचा एक व्हिडिओ 'एक्स'वर शेअर करत सीजेपीचा सह-संयोजक सौरव दास याने लिहिले आहे की, "मी म्हटल्याप्रमाणे केंद्र सरकार आपल्याच नागरिकांविरुद्ध युद्ध पुकारत आहे. हे दृश्यच त्याची साक्ष देत आहे."
दहशतीमुळे आंदोलन थांबणार नाही, सीजेपीचा सरकारला इशारा
लोकांना आंदोलनात सहभागी होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. अभिजीत दीपके म्हणाला की, आंदोलनापूर्वी देशभरातून हजारो तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 'एक्स'वर वरील एका पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, या दहशतीमुळे आंदोलन थांबणार नाही आणि परवानगी नाकारली असली तरी दिल्लीत जाऊन जंतरमंतरकडे कूच करु, असा इशारा सरकारला दिला.  "काहीही झाले तरी आम्ही जंतरमंतरकडे मार्च करूच," अशी पोस्ट दीपके याने शुक्रवारी रात्री केली.
तुमच्या कृतीची इतिहास दखल घेईल
सीजेपीचा सह-संयोजक आशुतोष रांका म्हणाला की, "हे आंदोलन अहिंसा आणि संविधानावर विश्वास ठेवते" आणि "तुमच्या कृतींची इतिहासात कशी नोंद होईल याचा विचार करावा", असे सरकार आणि पोलीस अधिकाऱ्यांना रांका म्हणाला. सीजेपीने असाही दावा केला आहे की, पोलिसांनी १० मोठे मास डिटेंशन सेंटर्स (आंदोलकांना ठेवण्यासाठीची केंद्रे) उभारले आहेत आणि आंदोलकांमध्ये भीती निर्माण करणे हाच यामागचा उद्देश आहे. दुसरीकडे, गोंधळ रोखणे आणि संवेदनशील ठिकाणांचे संरक्षण करणे हाच या निर्बंधांचा उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. परवानगी नाकारण्यात आल्यामुळे, जर आयोजकांनी मनाई हुकूमाचे उल्लंघन करून एकत्र येण्याचा किंवा मार्च काढण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना पोलिसांच्या कारवाईचा सामना करावा लागू शकतो.
दिल्लीत मोठ्या प्रमाणात निर्बंध
शनिवारी (१० ऑक्टोबर) नवी दिल्लीतील जंतरमंतरवर सीजेपीचे आंदोलन होत असून, दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली जात आहे. हे निर्बंध केवळ आंदोलन स्थळापुरते मर्यादित नसून सार्वजनिक वाहतूक, हॉटेल्स, रस्ते आणि दिल्लीच्या काही व्यावसायिक भागांपर्यंत लागू करण्यात आले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
किती खोटे बोलणार, किती खोट्या FIR करणार? रोहित पवारांचा पोलीस आयुक्तांना थेट सवाल, काही विद्यार्थी आंदोलनस्थळी उपस्थित नसतानाही त्यांची नावे गुन्ह्यात
पुढील बातमी
राष्ट्रपतींनी मतचोरीचे आरोप फेटाळले नाहीत, उलट मागितले पुरावे; राहुल गांधींचा मोठा दावा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचीही केली मागणी

संबंधित बातम्या