सातारा : शहरातील शेटे चौक परिसरात चोरट्यांनी सराफी दुकान लक्ष्य करत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 9 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरीचा माग लागू नये, यासाठी चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही स्क्रीन आणि डीव्हीआरही सोबत नेला. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
पाटखळ येथील अक्षय अंकुश शिंदे यांचे शेटे चौकात अवधूत ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. बुधवारी रात्री दुकान बंद करून शिंदे घरी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी दुकानाच्या शटरचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर साहित्य चोरून त्यांनी पोबारा केला. चोरट्यांनी चांदीचे पैजण व जोडवी प्रत्येकी 1 लाख 53 हजार रुपये, चांदीचे कडे 55 हजार रुपये, चांदीची माटली 81 हजार रुपये, चांदीच्या मूर्ती 33 हजार रुपये आणि चांदीचे छल्ले 36 हजार रुपये असा ऐवज चोरला. याशिवाय 60 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या 27 नथी, 1 लाख 30 हजार रुपयांच्या लहान मुलांच्या अंगठ्या आणि 1 लाख 25 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चमक्यांवरही चोरट्यांनी हात साफ केला.
दागिन्यांबरोबरच सीसीटीव्ही स्क्रीन, डिजिटल वजनकाटा आणि डीव्हीआर मशीनही त्यांनी नेले. या प्रकरणी अक्षय शिंदे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ आणि फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. उपनिरीक्षक जायपत्रे पुढील तपास करीत आहेत.
साताऱ्यात मध्यवस्तीतील सराफी दुकानावर चोरट्यांचा डल्ला; 9 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
by Team Satara Today | published on : 09 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा