सातारा : सातार्यात धंदा करायचा असेल तर एक लाख रुपये दे, अन्यथा तुला आणि तुझ्या घरच्यांना खल्लास करीन,’ अशी धमकी देत व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार सातार्यात समोर आला आहे. एक लाख रुपये न दिल्याने संबंधित व्यावसायिकाला काठीने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. एवढेच नव्हे तर त्याला जबरदस्तीने एसयूव्ही गाडीत बसवून सातार्यात आणण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
याप्रकरणी मोहसीन कासम मुल्ला (वय 27, व्यवसाय इलेक्ट्रॉनिक व होम अप्लायन्सेस वस्तूंची किरकोळ विक्री, रा. लक्ष्मी अपार्टमेंट, प्लॉट नं. 10, विकासनगर, खेड, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, अजय उर्फ लल्लन दत्तात्रय जाधव, विजय उर्फ बंबरु दत्तात्रय जाधव, ओमकार भरत देठे, सर्जेराव उर्फ छोट्या पांडुरंग कांबळे आणि त्यांचा एक अनोळखी साथीदार हे वेळोवेळी फिर्यादीकडे एक लाख रुपयांची मागणी करीत होते. पैसे न दिल्यास फिर्यादीसह त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
एक लाख रुपये देण्यास नकार दिल्यानंतर फिर्यादीला काठीने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींकडून वारंवार घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यातील विजय उर्फ बंबरु जाधव याने दमदाटी करून दि. 1 जून 2026 रोजी दत्ता जाधव यांच्या वाढदिवसासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी दोन हजार रुपये घेतल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.
दरम्यान, वाघेरी येथून फिर्यादीला बळजबरीने त्यांच्या गाडीत बसवून सातार्याच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा प्रकार दि. 1 जून ते 7 ऑक्टोबर 2026 या कालावधीत सातार्यातील विकासनगर परिसरात वेळोवेळी घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत
विकासनगर येथील व्यावसायिकाला मारहाण करून खंडणी मागितल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 08 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा