सातारा : आगामी नवरात्रोत्सव अत्यंत उत्साहात, शिस्तीत आणि शांततेत पार पडावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राधिका रोडवरील कदम पेट्रोल पंप समोरील मल्टीपर्पज हॉल येथे ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे 250 ते 275 गणेश व नवरात्र उत्सव मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, दुर्गा दौड धारकरी आणि डॉल्बी धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासकीय अधिकार्यांचे मार्गदर्शन या बैठकीस सातारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विवेक पाटील (तसेच श्री. विपुल पाटील), नायब तहसीलदार श्री. वैभव कदम, तहसीलदार कार्यालयाचे श्री. तुषार पोळ, तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीत प्रशासकीय अधिकार्यांनी उत्सव मंडळांना अधिकृत परवानग्या, आवश्यक कागदपत्रे आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
पोलीस प्रशासनाची त्रिसूत्री’ व मुख्य सूचना: सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निलेश तांबे आणि उपविभागीय पोलीस अधिकार्यांनी कार्यकर्त्यांना व ग्रामस्थांना खालीलप्रमाणे कडक निर्देश दिले:
अधिकृत परवानगी व नियम: प्रत्येक मंडळाने प्रशासनाकडून मंडप उभारणी व उत्सवाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. मंडपामुळे रस्ता किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
स्वयंसेवक व सीसीटीव्ही: मंडळांनी स्वयंसेवकांची यादी, फोटो आणि मोबाईल नंबर दर्शनी भागात लावावेत. सुरक्षेसाठी मंडप परिसरात उउढत कॅमेरे अनिवार्य असून दर्शनरांगेसाठी स्त्री-पुरुषांचे स्वतंत्र विभाग करावेत.
ध्वनिप्रदूषण व मिरवणूक: ध्वनिक्षेपकाचा (लाऊडस्पीकर) वापर शासनाने घालून दिलेल्या वेळ व मर्यादेतच करावा. मिरवणुकीचा मार्ग आणि वेळ पोलीस ठाण्याशी समन्वय साधूनच निश्चित करावी.
सुरक्षा व सामाजिक भान: उत्सवातील देखावे सामाजिक विषयांवर आधारित असावेत. मंडपात अग्निशामक यंत्रणा आणि सुरक्षित विद्युत वायरिंग असावी. मंडप परिसरात दारू, मटका, जुगार अशा बेकायदेशीर प्रकारांना सक्त मनाई आहे. तसेच, सोशल मीडियावर अफवा किंवा आक्षेपार्ह संदेश पसरवणार्यांवर कडक कारवाई केली जाईल. ग्रामसुरक्षा दल: गावांमध्ये सुरक्षेसाठी 10 ते 15 तरुण कार्यकर्त्यांचे ’ग्रामसुरक्षा दल’ स्थापन करून त्यांना शिट्टी, लाठी, बॅटरी व टी-शर्ट पुरवून रात्रीच्या गस्तीसाठी कार्यान्वित करावे.
बिबट्याच्या वावराबाबत विशेष सतर्कतेचा इशारा सातारा परिसरात बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता पोलीस व वन प्रशासनाने ग्रामस्थांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळावे, लहान मुलांना एकटे सोडू नये आणि बाहेर पडताना टॉर्चचा वापर करावा. शेतात काम करताना सतर्क राहावे. बिबट्या दिसल्यास गर्दी करणे, फोटो किंवा व्हिडिओ काढणे आणि त्याला चिथावणे टाळावे. गावाभोवतीचा परिसर स्वच्छ व प्रकाशमय ठेवावा तसेच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ वनविभाग किंवा पोलिसांशी संपर्क साधावा.
सामाजिक एकोप्याचे आवाहन नवरात्र उत्सव हा श्रद्धा, आनंद आणि सामाजिक एकोप्याचा सण आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व उत्सव मंडळांनी पोलीस प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे आणि शांतता, शिस्त व सुरक्षितता’ या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी शेवटी केले.
नवरात्रोत्सवात कायदा-सुव्यवस्थेसाठी 'शांतता, शिस्त व सुरक्षितते'ची त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन; सातारा तालुका पोलिसांकडून मंडळे व ग्रामप्रमुखांची बैठक
by Team Satara Today | published on : 08 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा