भुईंज : येथील श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट व दसरा उत्सव समितीच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव व वार्षिक यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारपासून (दि. ११) घटस्थापनेने उत्सवाला प्रारंभ होणार असून, मंगळवारी (ता. २०) विजयादशमीच्या दिवशी मुख्य यात्रा होणार आहे. सलग दहा दिवस धार्मिक, पौराणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.
चांदीच्या प्रभावळीत विराजमान होणारी देवी महालक्ष्मीची उत्सवमूर्ती भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. सुवर्ण अलंकार, हिरे, रत्न व माणिकांनी सजविलेल्या देवीच्या उत्सवमूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे. घटस्थापनेपासून पहाटे सनई-चौघडा व नगाऱ्यांच्या गजरात देवीची षोडशोपचार पूजा व आरती होणार आहे. कृष्णामाईच्या काठावरील देखणे घाट, महर्षी भृगुऋषींची समाधी आणि पुरातन महालक्ष्मी मंदिरामुळे भुईंजचा यात्रोत्सव धार्मिक व ऐतिहासिक महत्त्वाचा मानला जातो. मुख्य यात्रेदिवशी सायंकाळी सीमोल्लंघनाची ऐतिहासिक मिरवणूक, पालखी ग्रामप्रदक्षिणा, रात्री छबिना, पारंपरिक वाद्यांचा गजर व आतषबाजी होणार आहे. यात्राकाळात राज्यस्तरीय कबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धा, ललित सहस्रनाम कुंकुमार्चन, दुर्गासप्तशती पठण, भजनी मंडळांचे कार्यक्रम तसेच १४ ऑक्टोबरला ‘फुलवंती’ लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भुईंजच्या श्रीमहालक्ष्मी यात्रेची जय्यत तयारी; रविवारपासून घटस्थापनेने उत्सवाला प्रारंभ होणार
by Team Satara Today | published on : 08 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा