अमावस्येपर्यंत तक्रार मागे घेतली नाही तर घरदार संपवू; कथित भोंदूची पीडितेच्या कुटुंबाला धमकी, कुटुंबात भीतीचे वातावरण

by Team Satara Today | published on : 08 October 2026


फलटण : भूतबाधा झाल्याचे सांगून ती काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित कुटुंबाला धमकावण्याचा प्रकार समोर आला आहे.
पीडित कुटुंबाच्या घराबाहेर कथित भोंदू गुरु-चेल्यांकडून धमकीवजा चिठ्ठी लिहून ठेवण्यात आली असून, ‘अमावस्येपर्यंत तक्रार मागे घेतली नाही तर घरदार संपवू’, असा मजकूर त्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. चिठ्ठीजवळ लिंबू, हळद-कुंकू आणि टाचण्या आदी वस्तू ठेवण्यात आल्याने कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणातील तक्रारीनुसार, चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला भूतबाधा झाल्याचे भासवून तिच्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने संशयित सौरभ नाना मदने याने तिच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. भूत उतरविण्याच्या नावाखाली मुलीला विविध ठिकाणी नेण्यात आले. त्यानंतर एका पडक्या घरात नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला.
विशेषतः अल्पवयीन मुलांच्या बाबतीत अशा व्यक्तींवर आंधळा विश्वास न ठेवता पालकांनी तातडीने डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ किंवा संबंधित शासकीय यंत्रणांची मदत घेणे गरजेचे असल्याचे पोलिस सांगत आहेत. अत्याचाराच्या तक्रारीनंतर पीडित कुटुंबाला धमकावण्यासाठी चिठ्ठी लिहिणे आणि घराबाहेर संशयास्पद वस्तू ठेवणे हा प्रकार स्वतंत्रपणे गंभीर आहे. या प्रकारामागे नेमके कोण आहेत, चिठ्ठी कोणी लिहिली आणि पीडित कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न कोणी केला, यांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.संबंधित पडक्या घरात हळद-कुंकू, गुलाल, बिस्कीट, वेफर्स आदी वस्तू आढळल्याचेही समोर आले आहे. या वस्तूंचा वापर नेमका कशासाठी केला जात होता, याबाबत पोलिस तपास करत आहेत. या घटनेमुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली तथाकथित भोंदू व्यक्तींवर विश्वास ठेवण्याचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
न्हाळेवाडी परिसरात ड्रोन कॅमेऱ्यांमधून शोध; मात्र नरभक्षक बिबट्याचा चार दिवसांत मागमूस नाही; परिसरात भीतीचे वातावरण
पुढील बातमी
जिल्ह्यातील सहा दुष्काळी तालुक्यांत ४० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचे पंचनामे पूर्ण; संपूर्ण पंचनामे पूर्ण होण्यासाठी अजून आठवडा लागणार

संबंधित बातम्या